Tuesday, January 20, 2026

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘

मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिलीच एकदिवसीय सामन्याची मालिका आहे. २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे १८ एकदिवसीय सामनेच आहेत आणि त्यापैकी ३ सामने झाले. या मालिकेतील पराभवामुळे भारताच्या वर्ल्ड कप तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्याची मालिका जिंकली होती, तरीही त्यांना किवींविरुद्ध समाधानकारक कामगिरी करता आली नाही.

मागच्यावेळेस ऑस्ट्रेलियाने भारतात एकदिवसीय सामन्याची मालिका २-१ अशी जिंकली होती. रोहित शर्माला सलामीला आलेले अपयश, रवींद्र जडेजाची निराशाजनक कामगिरी आणि मधल्या फळीती सातत्य नसणे, यामुळे भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागली.

रोहितला पॉवर प्लेमध्ये अपयश : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला संघाला अपेक्षित सुरुवात करून देता आली नाही. त्याला तीन सामन्यांत २०.३३ च्या सरासरीने फक्त ६१ धावा करता आल्या. २६ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. रोहितच्या अपयशामुळे मधल्याफळीवर दडपण वाढले आणि तिसऱ्या व निर्णायक सामन्यात भारताने पटापट विकेट्स गमावल्या.

रवींद्र जडेजाने केले निराश : भारताचा यशस्वी अष्टपैलूंपैकी एक रवींद्र जडेजाने या मालिकेत दोन्ही आघाड्यांवर निराश केले. तिसऱ्या सामन्यात त्याने ६ षटकांत ४१ धावा दिल्या. विशेष म्हणजे ३ सामन्यांत मिळून त्याने फक्त ४३ धावा केल्या. त्याने पहिल्या दोन सामन्यांत गोलंदाजीत ४४ व ५६ धावा देताना एकही विकेट घेतली नाही. तेच फलंदाजीत त्याने २७ व ४ धावांचे योगदान दिले.

मधल्या फळीमध्ये गोंधळ : लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयश आले. बिनबाद २८ वरून भारताची अवस्था पुढील ९ षटकांत ४ बाद ७१ अशी झाली. अय्यरने ३ सामन्यांत २० च्या सरासरीने ६० धावा केल्या, तर लोकेशने ३ सामन्यांत एका शतकासह १४२ धावा केल्या.

Comments
Add Comment