नवी मुंबई : उरण पूर्व भागाचा पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याशी थेट संपर्क साधणारा गव्हाणफाटा ते चिरनेर दरम्यानचा रेल्वे पूल अखेर पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. अनेक अडचणींमुळे दीर्घकाळ रखडलेला हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून त्रस्त असलेल्या उरण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
जेएनपीए बंदरातून होणारी कंटेनर वाहतूक वाढल्याने मालगाडी मार्गावर दुहेरी कंटेनर वाहतुकीची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी जुन्या पुलाची उंची अपुरी ठरत असल्याने तो पूल तीन वर्षांपूर्वी हटवण्यात आला. नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असली, तरी तांत्रिक अडथळे, परवानग्यांचा विलंब आणि कामातील अडथळ्यांमुळे प्रकल्प अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.
या पुलामुळे पूर्वी दररोज हजारो वाहने पनवेल, मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने थेट प्रवास करत होती. पूल हटवल्यानंतर ही सोय बंद झाली आणि वाहनचालकांना लांबचा वळसा घ्यावा लागत आहे. अतिरिक्त अंतरामुळे वेळ फुकट जात असल्याने शिवाय लागणारे जास्त इंधन आणि अपघातांचा धोका वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून सातत्याने होत आहे.
याशिवाय, होणाऱ्या पुलाच्या गैरसोयीमुले उरण तालुक्यातील काही गावांची बससेवा बंद झाली आहे. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून रोजच्या प्रवासाचा खर्च वाढला आहे. बाजारपेठ, नोकरी आणि शिक्षणासाठीचा प्रवास अधिकच किचकट झाला आहे.
रेल्वे विभागाकडून सध्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून मार्च २०२६ पर्यंत हा पूल वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, हा पूल लवकर सुरू व्हावा, अशी जोरदार मागणी उरण परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.






