‘कष्टकरी’, माकपसह अनेक संघटना सहभागी
पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदर, चौथी मुंबई आणि जिंदाल बंदर या प्रकल्पांमुळे स्थानिक नागरिकांचे सर्व प्रकारे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प रद्द करा या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.
जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी आणि आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट 'आक्रोश मोर्चा' काढला. ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघापासून सुरू झालेला हा मोर्चा हुतात्मा स्मारकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंत तेथेच कष्टकरी संघटनेचे बेमुदत आंदोलन सुरू झाले आहे. वाढवण बंदर रद्द करा, चौथी मुंबई नको, अदानी हटाओ, गाव वाचवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वाढवण बंदर, चौथी मुंबई, जिंदाल बंदर आणि रिलायन्स टेक्सटाईल पार्क यांसारख्या प्रकल्पांमुळे पालघरच्या अस्तित्वावर घाला घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकल्पांमुळे २० हजार मच्छीमारांची रोजीरोटी आणि ५ हजार घरांवर गंडांतर येणार आहे. यासाठी ७ कोटी टन दगड आणि २० कोटी घनमीटर वाळू वापरली जाणार असून डोंगर आणि जलस्रोत नष्ट होतील. १९ जून २०२५ च्या शासन निर्णयानुसार ११० आदिवासी गावे 'विकास केंद्रा'साठी घोषित केली आहेत. यामुळे आदिवासींचा घटनादत्त 'पेसा' अधिकार धोक्यात आला आहे. अदानी समूहाकडून डहाणू खाडी, थर्मल पॉवरची जमीन आणि सिमेंट प्लांटद्वारे परिसरातील गावे गिळंकृत केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दहा हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर, त्याचे रूपांतर सभेत झाले. त्यानंतर कष्टकरी संघटनेने त्याच ठिकाणी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले.
या आंदोलनात ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघ, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, कष्टकरी संघटना, भूमी सेना, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नॅशनल फिशवर्कर्स फोरम आणि विविध ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.