एकनाथ शिंदे; शिवसेना जनादेशाच्या विरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही
मुंबई : “२३ जानेवारीपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र शिवसेना असा कोणताही निर्णय घेणार नाही, जो जनादेशाच्या विरोधात असेल. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपने युतीत लढवली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी युतीत निवडणूक लढवली आहे, तिथे महायुतीचाच महापौर होईल”, अशी भूमिका शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मांडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
दरम्यान, पालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना वांद्रेतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी सकाळी सर्व २९ नगरसेवक आपला गट स्थापन करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तालयात जाणार होते. त्यानुसार, त्यांना सकाळी १० वाजेपर्यंत हॉटेलमधून चेकआऊट करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, कोकण विभागीय आयुक्तालयाचा दौरा अचानक रद्द करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या शपथविधीनिमित्त शिवसेनेचे प्रमुख नेते दिल्लीत असल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नगरसेवकांची मूळ कागदपत्रे पक्षाकडे जमा
गेल्या चार दिवसांपासून वांद्रेतील हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मंगळवारी आपापल्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली. त्याचवेळी गटनोंदणीसाठी आवश्यक असलेले सर्व मूळ दस्तावेज त्यांच्याकडून घेण्यात आले आहेत. पक्षाने जी कागदपत्रे विजयी नगरसेवकांकडून घेतली आहेत त्यात १६ तारखेला निकालानंतर मिळालेल्या निवडीचे प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्याशिवाय सर्व नगरसेवकांचे आधार कार्डही पक्षाने घेतले आहे.






