मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत. यावेळच्या सभागृहात १४६ मराठी नगरसेवकांसह मुंबईचा ‘मराठी बाणा’ कायम असला तरी २१ गुजराती, १७ हिंदी भाषक आणि ३२ मुस्लीम नगरसेवकांसह ७० नगरसेवक निवडून आले असून, मुंबईचे बहुभाषिक स्वरूप अधिक गडद केले आहे. मुंबईच्या राजकारणाचा कणा असलेला मराठी मतदार अद्याप निर्णायक भूमिकेत आहे. उबाठा गट, शिवसेना व भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी मराठी चेहऱ्यांना झुकते माप दिले. विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, यशवंत किल्लेदार आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी नावांसह अंकित प्रभू आणि राजुल पाटील यांसारख्या युवा/वारसदार चेहऱ्यांनी ‘मराठी टक्का’ भक्कम ठेवला आहे.
व्यापारीवर्ग व उत्तर भारतीय मतदारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. २१ गुजराती व १७ हिंदी भाषक नगरसेवकांच्या निवडीमुळे भाजप व शिवसेनेच्या गटांना दिलासा मिळाला आहे. नील सोमय्या, आकाश पुरोहित व पंकज यादव यांसारख्या उमेदवारांनी आपल्या समाजाच्या मतांचे यशस्वी ध्रुवीकरण केल्याचे दिसून येते. निवडणुकीत ३२ मुस्लीम नगरसेवक निवडून येणे ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.






