Tuesday, January 20, 2026

बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

बंगळूरुत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय

कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणाऱ्या बंगळूरु येथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळूरु एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निवडणूक लागणार आहे. जिल्हा पंचायत-पंचायत समिती निवडणूकही बॅलेट पेपरवर मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस संगरेशी यांनी म्हटलं की, या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही बॅलेट पेपरने घेतल्या जातील. १० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर २५ मे झाल्यावर स्थानिक निवडणुका घोषित केल्या जातील. यावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल असं त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं कारण स्पष्ट केले नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास कायद्यात कुठेही अडचण नाही. त्यामुळे या निवडणुकीत बॅलेटचा वापर केला जाईल इतकेच निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्ष करतात. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात अशाप्रकारे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा संदर्भ ईव्हीएमवरील आरोपांशी जोडला जातो. तर बॅलेटच्या वापरावर बंदी नाही. अमेरिकेसारख्या विकसित देशातही बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली जाते. भारतात केवळ विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर केला जातो. राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे असं संगरेशी यांनी स्पष्ट केले.
Comments
Add Comment