मुंबई : महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विशेष रणनीती आखली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी 'घड्याळ' आणि 'तुतारी' ही दोन्ही चिन्हे सोयीनुसार वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, समन्वयाची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार 'घड्याळ' चिन्हावर लढणार असून, या उमेदवारांची जबाबदारी तुतारी चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर असेल. मात्र, शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र दोन्ही चिन्हांवरील उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हीच रणनीती अवलंबली जाणार आहे. महापालिका निवडणुकांनंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
मात्र, शरद पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी याला विरोध दर्शवला आहे. "शरद पवारांचे विचार वेगळे आहेत, तर अजित पवार सत्तेसोबत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या असतील, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल आणि शरद पवारांच्या विचाराने पुढे जावे लागेल," असे जानकर म्हणाले. "सध्याच्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखे होईल," असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
...तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल
उत्तम जानकर म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यात तुतारीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात आहे. काही ठिकाणी तिढा निर्माण झाला असला, तरी तडजोड करू. ग्रामीण भागात शरद पवारांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. ईव्हीएम तपासल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही. अजित पवारांना निर्णय घ्यावा लागेल, एकतर सत्तेतून बाहेर पडावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.






