डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या नवनीत नगरमध्ये घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरमधून वायू गळती झाली. या गॅस गळतीमुळे केतन देढिया (३५), मेहुल वासाड (४०), विजय घोर (४५), हरिश लोढाया (५०) आणि हरिश यांचा मुलगा पार्श्व लोढाया (७) हे पाच जण जखमी झाले.
केतन देढिया यांच्या घरात गॅस गळती झाली. गॅस गळतीमुळे केतन देढिया ५० टक्के भाजले. सध्या केतन देढिया यांच्यावर मुंबईत सायन येथे लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित किरकोळ जखमींना आवश्यक ते उपचार करुन घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेकडे देसलेपाडा परिसरात असलेल्या नवनीतनगर गृहसंकुलातील डब्ल्यू व्ही च्या ५१० नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणारे केतन देढिया यांच्या घरात गॅस गळती झाली. गळती सुरू असतानाच केतन यांनी घरातील दिवा लावला. यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे स्फोट झाला. स्फोटात केतन देढिया यांच्या घराचे नुकसान झाले. केतन देढिया यांच्यासह एकूण पाच जण स्फोटामुळे जखमी झाले.
स्फोटाचा आवाज आला पाठोपाठ केतन यांच्या घराची घराची खिडकी आणि ग्रील तुटून इमारतीच्या तळमजल्यावर कोसळली. हा ढिगारा अंगावर कोसळल्यामुळे हरिश लोढाया (५०) आणि हरिश यांचा मुलगा पार्श्व लोढाया (७) हे दोघे जखमी झाले. तर गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात केतन देढिया (३५), मेहुल वासाड (४०), विजय घोर (४५) हे ३ जण जखमी झाले.
जखमी झालेल्या पाच जणांपैकी केतन देढिया ५० टक्के भाजले आहेत तर उर्वरित चौघे किरकोळ जखमी आहेत. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.






