Tuesday, January 20, 2026

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नेमक प्रकरणं काय

एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; नेमक प्रकरणं काय

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका कुटुंबाचा एकाच रात्रीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खोलीत पती, पत्नी, दोन अल्पवयीन मुले आणि एक वृद्ध महिलेचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू नैसर्गिक नसून गोळीबारामुळे झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

अशोक, त्यांची पत्नी अंजिता, आई विद्यावती तसेच दोन मुले कार्तिक आणि देव अशी मृतांची ओळख पटली आहे. पोलिसांना घटनास्थळी तीन देशी पिस्तूल सापडली असून सर्व मृतांच्या डोक्यावर गोळी लागल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार सामूहिक हत्याकांड आहे की आत्महत्येपूर्वी केलेला कुटुंबसंहार, याबाबत तपास सुरू आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, अशोक यांनी आधी आई, पत्नी आणि दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं असावं, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, या निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी प्रत्येक शक्यता तपासली जात आहे.

कुटुंबावर आर्थिक कर्जाचा ताण होता का, नोकरीसंदर्भात काही अडचणी होत्या का?, मानसिक तणाव किंवा कौटुंबिक वाद होते का?, याचाही शोध घेतला जात आहे. यासोबतच बाहेरील व्यक्तीने घरात घुसून गोळीबार केला का, या दिशेनेही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.

मृत अशोक हे तहसील कार्यालयात कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना ही नोकरी मिळाली होती. त्यांची दोन मुले नववी आणि दहावी इयत्तेत शिकत होती. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे कुटुंब शांत स्वभावाचे आणि कोणाशीही त्यांचे वाद नव्हते.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घर सील करण्यात आले असून सर्व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू असून नेमकं सत्य काय?, हे पुढील तपासातूनच समोर येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा