- मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रत्यक्षात एवढ्या कमी कालावधीमध्ये ही निवडणूक घेणे अशक्यच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होते की सुट्टीच्या दिवशी शनिवारी ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारी की ०२ फेब्रुवारी रोजी होईल याबाबत तर्क लढवले जात आहे.
मुंबईच्या महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जात असल्याने भाजपच्या दिल्लीचा हवाल देत महापौर पदाची निवडणूक येत्या ३० जानेवारी रोजी होईल अशाप्रकारचे चित्र रंगवले जात आहे. परंतु २२ जानेवारी नंतर एकमेव शुक्रवारचा दिवस असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे याचे नोटीफिकेशन जाहीर करून त्यानुसार महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्याचा तसेच उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी गृहीत धरल्यास एवढ्या कमी अवधीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. खुद्द महापालिका सचिव विभागाला याबाबत कोणत्याही सूचना नाही. त्यातच सुट्ट्या येत असल्याने त्या वगळून हा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निवडणूक जरी घ्यायची झाल्यास शनिवारी किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी घ्यावी लागेल किंवा सोमवारी २ फेब्रुवारी रोजी घ्यावी लागेल अशाप्रकारचे चित्र आहे.त्यामुळे महापौर निवडणुकीबाबत कार्यक्रम जाहीर कशाप्रकारे होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.






