मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यात महाराष्ट्र सदनात बैठक झाली. या बैठकीत महापौरपदासह स्थायी समिती आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा झाली. मुंबई पालिकेमध्ये सन्मानपूर्वक पदे मिळावीत, अशी भूमिका शिवसेनेने मांडल्याचे कळते.
मुंबई पालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी २५ जागांची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या साथीशिवाय बहुमत सिद्ध करणे कठीण असल्याने त्यांच्याकडून अडीच वर्षांच्या महापौर पदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहे. त्यासाठीच त्यांनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये स्थलांतरित केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या नेत्यांनी याविषयी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली असून, त्यांनी मित्रपक्षांशी समन्वयाने तोडगा काढण्याची सूचना केल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत महापौर, स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीसह बेस्ट समितीत शिवसेनेला सन्मानजनक वाटा मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली. आता शिवसेनेच्या मागण्यांचा तपशील घेऊन अमित साटम आणि आशिष शेलार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नवीन यांच्याशी चर्चा करतील. दरम्यान, येत्या ३० जानेवारीला भाजपचा महापौर मुंबईत विराजमान व्हावा, अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.






