Tuesday, January 20, 2026

Akshay Kumar Car Accident : अक्षय कुमारच्या डोळ्यासमोर सुरक्षा ताफ्याचा भीषण अपघात; मर्सिडीजने रिक्षेला चिरडले, जुहू परिसरात मध्यरात्री खळबळ

Akshay Kumar Car Accident : अक्षय कुमारच्या डोळ्यासमोर सुरक्षा ताफ्याचा भीषण अपघात; मर्सिडीजने रिक्षेला चिरडले, जुहू परिसरात मध्यरात्री खळबळ

मुंबई : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाचा सोमवारी रात्री जुहू परिसरात भीषण अपघात झाला. जुहू येथील 'थिंक जिम' जवळ एका भरधाव मर्सिडीज कारने अक्षय कुमारच्या ताफ्यामागे असलेल्या रिक्षेला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, रिक्षाचालक बासित खान हा गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अक्षय कुमार आपल्या कारमधून घराकडे जात होता. त्यांच्या कारच्या मागे सुरक्षेसाठी एक 'एस्कॉर्ट SUV' चालली होती. या सुरक्षा वाहनाच्या अगदी मागे बासित खान आपली ऑटो रिक्षा चालवत होता. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका अतिवेगवान मर्सिडीज कारने रिक्षाला मागून प्रचंड जोरात धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीजची धडक इतकी जोरदार होती की रिक्षा पुढे असलेल्या अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनाच्या (SUV) खाली घुसली. धडकेनंतरही मर्सिडीज चालकाने ब्रेक न लावल्याने रिक्षा SUV च्या खाली दबली गेली आणि त्यामुळे सुरक्षा वाहनाचा मागील भाग चक्क हवेत उचलला गेला. या विचित्र अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघाताच्या वेळी अक्षय कुमार पुढच्या कारमध्ये होता, त्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच त्याच्या सुरक्षा ताफ्यातील कर्मचारीही थोडक्यात बचावले आहेत. मात्र, रिक्षाचालक बासित खान याची प्रकृती चिंताजनक असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. मर्सिडीज चालक मद्यधुंद अवस्थेत होता का किंवा गाडीचा ब्रेक निकामी झाला होता का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मर्सिडीजने रिक्षाला चिरडले, चालक गंभीर

अपघातानंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. भरधाव मर्सिडीजने चिरडलेल्या रिक्षेत चालक बासित खान रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून आणि जीवाची पर्वा न करता मोठ्या कष्टाने अक्षय कुमारच्या SUV खाली अडकलेली रिक्षा बाहेर काढली. अपघाताचा प्रचंड आवाज आणि लोकांचा आक्रोश ऐकून स्वतः अभिनेता अक्षय कुमार आपल्या कारमधून खाली उतरला. त्याने परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळावरील वाढती गर्दी, परिस्थितीची नाजूकता आणि सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षा पथकाने त्याला तातडीने दुसऱ्या वाहनातून सुरक्षितस्थळी हलवले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बासित खानच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. बासितचा भाऊ समीर खान याने माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, "माझा भाऊ मृत्यूशी झुंज देत आहे, आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला पोलिसांकडून हवी तशी मदत मिळत नाहीये. आमची एकच मागणी आहे की, ज्या मर्सिडीज चालकाने हे कृत्य केले आहे, त्यानेच माझ्या भावाच्या उपचाराचा खर्च उचलावा आणि आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या रिक्षेच्या नुकसानीची भरपाई द्यावी."

घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मर्सिडीज कार जप्त केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. अक्षय कुमार यांच्या पीआर टीमकडूनही या घटनेवर सध्या मौन बाळगण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सध्या पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.(Akshay Kumar Car Accident)अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून त्यात अक्षय कुमार यांची सुरक्षा वाहन ऑटो रिक्षावर उलटलेली स्पष्टपणे दिसत आहे. अपघात होताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेची तीव्रता त्यातून दिसून येते.

अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना सुरक्षित, मात्र...

जुहू येथील भीषण अपघातातून बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे सुदैवाने पूर्णपणे सुरक्षित आहेत. या घटनेमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र दोघेही सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्याने चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे. या गंभीर अपघाताला २४ तास उलटूनही अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार किंवा एफआयआर (FIR) दाखल झालेली नाही, ही बाब विशेष लक्षवेधी ठरत आहे. जुहू पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. हा अपघात मर्सिडीज चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. इतकी मोठी घटना घडूनही अक्षय कुमारच्या अधिकृत टीमकडून किंवा प्रवक्त्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. अपघातानंतर अक्षय कुमारला सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने तेथून नेण्यात आले होते. दरम्यान, अपघातानंतर जुहू परिसरात काही काळ प्रचंड तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >