मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक आहेत, तर राज्यात हा आकडा आता शंभरी पार गेला आहे. काही हिंदू नगरसेवकही ‘एमआयएम’च्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे आमचा चेहराही धर्मनिरक्षेप असल्याचा दावा करत राज्यातील ग्रामीण मतदारसंघातही नशीब आजमावून बघण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले. तेलंगणातील ‘एमआयएम’ पक्षाचा संबंध थेट हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी जोडलेला असल्याने ‘एमआयएम’ हा मुस्लिमांचा पक्ष अशी पक्षाची प्रतिमा आहे. मात्र, आमचा ‘मोगल’, ‘निजाम’ आणि अगदी आक्रमक असणाऱ्या मोहम्मद गझनीशी संबंध नाही. तो इतिहास होता. आताच्या मुस्लिमांचा त्यांच्याशी काही संबंध नाही, अशी भूमिका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि ॲड. असदोद्दीन ओवैसी यांनी जाहीरपणे मांडली.






