पंढरपूर : कान्हापुरी (ता. पंढरपूर) येथील राहुल रघुनाथ भारती या तरुणाने न्युझीलंडमध्ये ‘हार्स रेसिंग स्पर्धेत’ तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे. ग्रामीण भागातील या तरुणाने सातासमुद्रापलीकडे जाऊन भारताचा डंका पेटला आहे. रेसिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
अवघ्या ३२ वर्षांच्या राहुल भारती या तरुणाला लहानपणापासूनच घोड्याच्या रेसिंग स्पर्धेविषयी खूप आकर्षण होते. पुणे येथे त्यांनी काही वर्षे प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट न्युझीलंड गाठले. महाराष्ट्रात जसे बैलगाडी शर्यतीला मानाचे स्थान आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धेला मोठी प्रतिष्ठा आहे.
हीच संधी साधून राहुल भारती या तरुणाने न्यूझीलंडमध्ये आपल्यातील कलागुण सिद्ध करून दाखवले आहेत. राहुल भारती यांचे वडील हे शेतकरी असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहुल याने न्युझीलंडमध्ये जाऊन हॉर्स रेसिंग स्पर्धेत भारताचे नाव रोशन केले आहे. अलीकडेच न्यूझीलंडमध्ये हॉर्स रेसिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये राहुल याने तब्बल २५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. त्याच्या या यशाची माहिती मिळताच कान्हापुरी गावामध्ये आनंदाला उधाण आले आहे.






