मुंबई महापालिकेत पाचव्या क्रमाकांवर नोटाला मतदान
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक राजकीय दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असला, तरी ‘नोटा’चा प्रभाव मात्र लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून आला आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये तब्बल ८७,०१३ मतदारांनी कोणालाही मतदान न करता ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.
मतांच्या या आकड्याने राजकीय पक्षांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे केले असून, ‘नोटा’ला मिळालेल्या एकूण मतांनी निवडणुकीत पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २२६ मध्ये १४०४ मते नोटाला मिळाली आहेत. याशिवाय इतर दोन प्रभागांत एक हजारहून अधिक मते पडली असून, इतरत्र मतांचा टक्का चांगला आहे. नोटाला भरभरून झालेल्या मतदानावरून निवडणूक रिंगणातील उमेदवार मुंबईकरांना फारसे पसंत पडले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईच्या निवडणूक रिंगणात २२७ प्रभागांतून शिवसेना ठाकरे, भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह इतर पक्षांचे आणि अपक्ष असे १७०० उमेदवार निवडणूक लढवत होते, तर एक कोटी तीन लाखांहून अधिक मतदार होते. निवडणूक रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने यंदा मतदरांसमोर पर्याय उपलब्ध होते.
उमेदवारांच्या कोलांटउडीवर निषेधाचे अस्त्र पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी पक्षाचे अधिकृत तिकीट मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत उमेदवारी मिळवली होती. काही जण तर शेवटच्या दोन तासांत भलत्याच पक्षाकडून तिकीट मिळवत निवडणूक रिंगणात उतरले होते. हा राजकीय चिखल आणि उमेदवारांच्या उड्या मारण्याची वृत्ती पसंत न पडल्याने अनेक सुशिक्षित मतदारांनी निषेध म्हणून नोटाला मतदान केले असणार आहे. त्यामुळेच आतापर्यंतची सर्वाधिक मते नोटाला मिळाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.






