नवी दिल्ली : संयुक्त अरब आमिराती अर्थात UAE चे राजे आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सोमवारी भारतात येणार आहेत. ते संध्याकाळी ४.२० वाजता दिल्लीत येतील. संध्याकाळी ४.४५ वाजता पंतप्रधान मोदींना भेटतील. मोदींशी चर्चा केल्यानंतर संध्याकाळी ०६.०५ त्यांचे मायदेशासाठी रवाना होण्याचे नियोजन आहे. हा जेमतेम छोटेखानी दौरा फक्त मोदींना भेटण्यासाठी आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आमंत्रणाचा मान राखत संध्याकाळी युएईचे राजे आणि अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान दिल्लीत येत आहेत.
युएईच्या अध्यक्षांचा दौरा प्रथमदर्शन अगदी कमी कालावधीचा दिसत असला तरी खूप महत्त्वाचा आहे. जागतिक राजकारणात अशांतता असताना हा दौरा होत आहे. रशिया - युक्रेन संघर्ष सुरू आहे. व्हेनेझुएला आणि ग्रीनलँडवरून अमेरिकेचे चीन आणि रशियाशी मतभेद आहेत, तर इराणमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. शिवाय, युएई आणि सौदी अरेबियामध्ये तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा दहा वर्षातला हा पाचवा भारत दौरा आहे. युएईचे अध्यक्ष झाल्यापासूनचा त्यांचा हा तिसरा भारत दौरा आहे. या दौऱ्यात काय चर्चा होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
युएई आणि भारत यांच्यात २०२४ - २०२५ दरम्यान १००.०६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेचा व्यापार झाला. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत व्यापारात १९.६ टक्क्यांची वाढ झाली, जी लक्षणीय म्हणता येईल अशीच आहे. आता युएई भारताच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक आहे.
युएईने पंतप्रधान मोदींना २०१९ मध्ये त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ झायेद' देऊन गौरविले आहे. मोदी सरकारच्या काळात युएई आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही देशांनी विविध क्षेत्रात व्यापारी संबंध मजबूत केले आहेत.






