Monday, January 19, 2026

गोव्यात १५ रशियन महिला हत्याकांडाचा उलगडा; आरोपी अलेक्सी लियोनोवची हादरवून टाकणारी कबुली

गोव्यात १५ रशियन महिला हत्याकांडाचा उलगडा; आरोपी अलेक्सी लियोनोवची हादरवून टाकणारी कबुली

गोवा : गोव्यात उघडकीस आलेल्या रशियन महिलांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. उत्तर गोव्यातील अरंबोल आणि मोरजिम परिसरात सापडलेल्या दोन रशियन महिलांच्या मृत्यूमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव याला गोवा पोलिसांनी अटक केली असून चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली आहे. केवळ या दोनच नव्हे, तर एकूण १५ महिलांची हत्या केल्याचा दावा अलेक्सीने केला आहे.

अरंबोलमध्ये काही दिवसांपूर्वी ३५ वर्षीय एलेना कस्तानोवा हिचा गळा चिरलेला मृतदेह भाड्याच्या खोलीत आढळून आला होता. घरमालकाने रात्री उशिरा खोली उघडली असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा तपास सुरू असतानाच पोलिसांना मोरजिम गावात आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला. ही महिला ३७ वर्षीय एलेना वानेएवा असून तिची हत्या १४ जानेवारी रोजी करण्यात आल्याचे तपासात समोर आले. दोन्ही महिलांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती.

तपासादरम्यान संशयाची सुई अलेक्सी लियोनोवकडे वळली आणि चौकशीत त्याने दोन्ही हत्या केल्याची कबुली दिली. मात्र, याहून धक्कादायक म्हणजे अलेक्सीने आपण आतापर्यंत १५ महिलांना ‘मोक्ष’ दिल्याचा दावा केला आहे. पोलिस सूत्रांनुसार, आरोपी रशियन महिलांशी मैत्री करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फायद्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि त्या महिलांनी विरोध केला किंवा दुसऱ्या व्यक्तीशी संपर्क वाढवला, तर त्यांची हत्या करायचा.

अलेक्सीने गोव्यासह हिमाचल प्रदेशातही हत्या केल्याचा दावा केला असला, तरी सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत दोनच हत्या अधिकृतपणे उघडकीस आल्या असून उर्वरित दाव्यांबाबत पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणामुळे गोव्यातील सुरक्षा व्यवस्थेवर आणि परदेशी नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोवा पोलीस आता या कथित सिरीयल किलरच्या दाव्यांमागचे सत्य उघड करण्यासाठी विविध राज्यांतील यंत्रणांशी संपर्क साधत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >