Monday, January 19, 2026

तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरावे, त्याची गुलामी नको !

तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरावे, त्याची गुलामी नको !

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : तंत्रज्ञान ही अपरिहार्य गोष्ट आहे. स्वदेशीचा वापर म्हणजे तंत्रज्ञान नाकारणे असे नाही; परंतु आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये.आपण उद्योग केवळ आपल्या नफ्यासाठी नाही, समाजाच्या भल्यासाठी करतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे आरएसएस च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित जनसभेत भागवत यांनी हे विचार मांडले. ते पुढे म्हणाले, समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी आपण काम करतो. त्यामधून आपला उदरनिर्वाह होतो. आपल्याकडचा शेतकरी अजूनही शेती करणे हा माझा धर्म आहे असे सांगतो. हा उदात्त विचार अन्य कुठे नाही. त्यामुळे आपले काम समाजाभिमुख आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशातील परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आपल्या तंत्रज्ञानामुळे समाजाचे नुकसान होणार नाही, रोजगार कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.

धर्मच मला आणि नरेंद्र मोदींना चालवत आहे. धर्म संपूर्ण ब्रह्मांडाचा चालक आहे. जेव्हा सृष्टी अस्तित्वात आली, तेव्हा तिच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारे नियम धर्म बनले. सर्व काही त्याच सिद्धांतावर चालते. भारताला आपल्या संत आणि ऋषींकडून मार्गदर्शन मिळत आले आहे. जोपर्यंत असा धर्म भारताला चालवेल, तोपर्यंत तो विश्वगुरु राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.संघ हा व्यक्ती निर्माणाचे काम करतो, याशिवाय काहीही करत नाही. संघ प्रतिक्रियेतून तयार झालेले संघटन नाही. संघाची कोणासोबत स्पर्धा देखील नाही. संघाला सर्व समाजाच्या सोबतीने भारताला परम वैभवसंपन्न करायचे आहे. संघाला स्वतः मोठे व्हायचे नाही. संघाला समाजाला मोठे करायचे आहे. संघाला समाजातील संघटन नाही तर, समाजाचे संघटन करायचे आहे. एक वेळ अशी आली पाहिजे की सर्व समाज संघाच्या विचारांनी काम करू लागेल, त्यावेळी संघाची वेगळी ओळख राहणार नाही. हेच संघाला अपेक्षित आहे. त्यामुळे संघ समजून घ्यायचा असेल तर संघाच्या शाखेत आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments
Add Comment