माझे जीवीची आवडी माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।। पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।। जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥ बापरखुमादेविवरु सगुण निर्गुण । रुपविटेवरी दाविली खूण ।।
- डॉ. देवीदास पोटे
पंढरीची वारी ही वारकरी भक्ती मार्गातील महत्त्वाची परंपरा आहे. वारी हे मराठी संस्कृतीचे वैभव आहे. पंढरपूर हे भक्तीचे आद्यपीठ आहे. विटेवरचा विठ्ठल या भक्ती पिठाचा अधिपती आहे. भक्तीचा हा प्रवाह शतकानूशतके पंढरपूरच्या दिशेने नाम गजर करीत, नाचत, अभंग गात वारीच्या वाटेवर चालतो आहे. हा भक्तीचा सोहळा कधी न संपणारा आहे, अक्षय आहे.
या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, “पंढरपूरला वारीबरोबर जाणे ही माझ्या मनाची मन:पूत आवड आहे. माझे मन पांडुरंगाच्या भक्तीरंगात बुडून गेले आहे. या गोविंदाच्या गुणांनी मनाला मोहून टाकले आहे. जागृत, अर्ध जागृत, आणि स्वप्न या तिन्ही अवस्थांचे भान हरपले असून विठ्ठलाचे सावळे रूप पाहताच मनात आनंदाच्या लाटा दाटून येतात. हा विठ्ठल जसा निर्गुण, निराकार आहे तसाच सगुण, साकार आहे. विटेवरचे त्याचे देखणे रूप ही सगुणपणाची खूण आहे.
पंढरपूरला जायचे तर वारीबरोबर पालखी व गुढी घेऊन. वारीची ही परंपरा संतांनी हजारो वर्षे अखंडितपणे सुरू ठेवली. वारीत समस्त वारकरी आपल्या परमदैवत असलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आंतरिक ओढीने चालत असतात. सर्वांचे ध्येय एकच असते ते म्हणजे विठू माऊलीला भेटणे. त्या सावळ्या परब्रह्माला आपल्या नेत्रांत, तनमनात साठवून ठेवणे. ‘पंढरपुरा नेईन गुढी’ या ओळीत वर्णन केलेली गुढी सामाजिक समतेची, बंधूतेची, भक्तीची आहे. तशीच निखळ आनंदाचीआहे. टाळ-मृदंगाचा ध्वनी, वीणेचा झणकार मनावर सात्विक आनंद लहरींची शिंपण करतो. ज्ञानोबा-तुकाराम हा नामगजर, कीर्तन, भारुड या सर्व प्रकारातून मनाला अपार आनंद आणि अपार भक्ती सुख मिळते.
पंढरपूरच्या अंतरीच्या अत्यंत ओढीने भक्तीची गुढी व पताका घेऊन पंढरपूरला जाण्याचा निर्धार संत ज्ञानेश्वर या अभंगातून व्यक्त करतात. त्यांनी उभारलेली ही गुढी भक्तीची आहे तशीच ती ज्ञानाची आहे, प्रेमाची आहे, समतेची आहे, आनंदाची आहे आणि धन्यतेची अनुभूती देणारी आहे. ज्ञानदेव-नामदेव आणि इतर वारकरी संतांनी रुजवलेली वारीची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. ती अनंत काळपर्यंत अशीच सुरू राहणार आहे. विठ्ठल भक्तीची ज्योत जागवीत...!





