मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी झालेली नाही नगरसेवक निवडून आल्यानंतर याबाबतची उमेदवारांची अधिकृत यादी राजपत्रात अर्थात याबाबत गॅझेट प्रसिद्ध होत नाही तोवर कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात याचे नोंदणी होत नाही तथा नगरसेवकांचे गट आघाडी यांचीही नोंदणी होत नाही त्यामुळे नगरसेवकांची अधिकृत नोंदणी होत नाही तो महापौर निवडीच्या सर्व चर्चा व्यर्थ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावाची गॅजेटेड प्रत प्रसिद्ध होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
मुंबई महापालिकेचा निकाल १६ फेब्रुवारी रोजी लागल्यानंतर १९ तारीख उलटली तरी निवडून आलेल्या मुंबई महापालिका सदस्यांची यादी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरसेवक निवडून येऊनही त्यांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात होऊ शकली नाही. त्यामुळे ही यादी राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आयुक्त हे राजकीय पक्षांना सूचित करून कोकण भवनमध्ये आपल्याला नगरसेवकांची तसेच यासाठीच्या फ्रंट ची नोंदणी करण्याच्या सूचना देतील. त्यामुळे नगरसेवकांची नोंदणी झाल्यानंतर सर्व नगरसेवक हे आपल्या राजकीय पक्षांना बांधिल होऊन तसेच आपल्या गटाला बांधिल होऊ शकतात. त्यामुळे येत्या २२ जानेवारी रोजी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाला आणि त्याच्या गटांची नगरसेवक संख्या निश्चित होवून त्यानुसार विविध समित्यांमध्ये सदस्यांची गणसंख्या ठरवता येईल आणि त्यानुसार महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडता येईल.
मुंबई महापालिकेत अशाप्रकारे असेल महापौरांची निवड...
- मुंबई महापालिकेत नव्याने आलेल्या सर्व नगरसेवकांची नोंदणी नगरसेवक म्हणून कोकण भवनामध्ये होईल..
- नगरसेवकांना आपले विजयी झालेले प्रमाणपत्र कोकण भवनमध्ये जमा करून त्याची पावती महापालिका सचिव विभागाकडे सादर केली जाईल...
- महापौरपदाची आरक्षण नगरविकास खात्यामार्फत काढले जाईल, त्याप्रमाणे त्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराच्या नावाची घोषणा राजकीय पक्षाकडून केली जाईल...
- महापौरांच्या निवडीसाठी विशेष सभेची घोषणा, सात दिवस आधी द्यावी लागणार याची कल्पना...
- महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या तीन दिवस आधी महापालिका सचिव यांना सादर केले जातील...
- त्याच वेळेला उपमहापौर पदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केले जातील...
- यापदासाठी प्रतिस्पर्धी पक्षाकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केला जावू शकतो...
- जर कुणीच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर बिनविरोध निवड होईल, परंतु याची घोषणा निवडणुकीच्या दिवशी पिठासिन प्राधिकृत अधिकारी करतील आणि महापौरांच्या नावाची घोषणा करतील...
- महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या नगरसेवकाला पिठासीन प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमले जाईल....
- या निवडणुकीत महापौर पदासाठी आपल्या उमेदवाराला आवाजी पध्दतीने मतदान करतील आणि आपल्या नावापुढे स्वाक्षरी करतील...
- महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर पिठासीन प्राधिकृत अधिकारी म्हणून नवनिर्वाचित महापौर हे उपमहापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळतील...
- दोन्ही निवडणूका पार पडल्यानंतर सर्व पक्षांच्यावतीने गटनेत्यांच्या नावासाठी पक्षांकडून आलेली पत्र महापौर वाचून दाखवून त्यांची निवड झाल्याचे जाहीर करतील....






