मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
यंदा बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. महोत्सव उद्घाटन समारंभात, बुधवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात पद्मपाणी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस हा महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होईल.
महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी इलयाराजा यांच्या निवडीची घोषणा केली. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर होत्या, तर सदस्य म्हणून आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी काम पाहिले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७ हजारांहून अधिक गाणी आणि १५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी अशा विविध भाषांतील त्यांची संगीतरचना आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य सिम्फनी यांचा सुरेख संगम ही त्यांची खास ओळख आहे. ‘इसैग्नानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलयाराजा यांच्या संगीत साधनेला हा पुरस्कार अर्पण करण्यात येणार आहे. या महोत्सवात देश-विदेशातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ. आशीष गाडेकर, कला संचालक डॉ. शिव कदम, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले.






