मुंबईकरांना फक्त इतकंच हवं असतं - आयुष्य थोडं तरी सोपं व्हावं. सकाळी कामावर जाताना अडचण नको, पाणी-वीज वेळेवर मिळावं, आजारी पडलो तर चांगला इलाज मिळावा, मुलांना नीट शिक्षण मिळावं आणि शहरात सुरक्षितपणे, सन्मानाने जगता यावं. सत्तेत आलेल्यांनी हे करून दाखवलं, तरच लोक मनापासून म्हणतील - ‘आमचं मत खरंच कामी आलं’
अल्पेश म्हात्रे
अखेर नऊ वर्षांनंतर का होईना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात वेगळीच हवा तयार होते. कोण जिंकलं, कोण हरलं, कोण सत्तेत आलं – यावर चर्चा तर होतेच, पण त्याहून जास्त चर्चा होते ती सामान्य माणसाच्या अपेक्षांची. कारण ही निवडणूक म्हणजे फक्त राजकीय पक्षांचा खेळ नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेली गोष्ट आहे. आपण चालतो ते रस्ते, आपण पितो ते पाणी, आपण प्रवास करतो ती बस, रुग्ण जातो ते रुग्णालय, मुलं जातात ती शाळा – हे सगळं पालिकेवर अवलंबून असतं. त्यामुळे निकाल लागल्यानंतर लोकांच्या मनात आनंद, आशा, अपेक्षा आणि थोडी भीती – अशा सगळ्या भावना एकत्र येतात.
सगळ्यात आधी लोकांना वाटतं,‘आपण दिलेलं मत वाया गेलं नाही.’ मतदानाच्या दिवशी रांगेत उभं राहून, ऊन-पावसाची तमा न बाळगता दिलेलं मत आता कुणाच्या तरी हातात सत्ता देतं, ही जाणीव लोकांना समाधान देते. प्रचारात उमेदवारांनी आणि पक्षांनी जी वचने दिली, ती आता तरी पूर्ण होतील, अशी आशा सगळ्यांच्या मनात असते. आपल्या भागातले खड्डे बुजतील, रस्ते नीट होतील, पाणी वेळेवर येईल, कचरा रोज उचलला जाईल, असं साधं-सोपं जगणं लोकांना हवं असतं.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, घरात पाणी घुसू नये, गटारं तुंबू नयेत, दुर्गंधी कमी व्हावी ही सामान्य माणसाची सगळ्यात मोठी अपेक्षा असते. आजारी पडलो तर जवळच दवाखाना असावा, तिथे डॉक्टर मिळावा, औषध मिळावं, रांगेत तासन्तास उभं राहावं लागू नये, असं त्यांना वाटतं. शाळेत शिक्षक वेळेवर यावेत, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, शाळा स्वच्छ असावी, चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन एक चांगली पिढी तयार व्हावी एवढंच त्यांना हवं असतं.
झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी निवडणूक म्हणजे आयुष्य बदलण्याची आशा असते. पक्कं घर, नळाचं पाणी, शौचालय, वीज, ड्रेनेज, कचरा उचलण्याची नीट सोय हे सगळं त्यांना फार महत्त्वाचं वाटतं. योजना जाहीर होतात, पण त्या प्रत्यक्षात याव्यात, फक्त कागदावरच राहू नयेत, अशी त्यांची इच्छा असते. पुनर्वसन करताना लोकांना त्रास न होता, सन्मानाने घर मिळावं, अशी त्यांची अपेक्षा असते.
तरुण मुलं-मुलींना नोकरीची, कामधंद्याची, शिकण्याच्या संधींची फार अपेक्षा असते. शहरात ट्रेन-बस नीट चालाव्यात, गर्दी कमी व्हावी, प्रवास थोडा तरी सोपा व्हावा, असं त्यांना वाटतं. सरकारी कामं ऑनलाइन सोपी व्हावीत, प्रमाणपत्र, परवाना, जन्मदाखले , मृत्यू प्रमाणपत्र , कर यासाठी ऑफिसात चकरा माराव्या लागू नयेत, अशी त्यांची इच्छा असते. शहर आधुनिक व्हावं, पण त्याचा फायदा फक्त श्रीमंतांनाच नाही, तर सामान्य माणसालाही व्हावा, हीच त्यांची खरी अपेक्षा असते.महिलांना सगळ्यात जास्त हवं असतं ते म्हणजे सुरक्षितता. रस्त्यावर दिवे असावेत, बस-रेल्वेत सुरक्षित वाटावं, रात्री उशिरा घरी जाताना भीती वाटू नये, असं त्यांना वाटतं. सार्वजनिक शौचालय स्वच्छ असावीत, दवाखान्यात महिलांसाठी नीट सोय असावी, गरोदर महिलांची नीट काळजी घेतली जावी, अशी त्यांची अपेक्षा असते. महिलांना कामधंद्याच्या संधी मिळाव्यात, प्रशिक्षण मिळावं, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, हीसुद्धा मोठी अपेक्षा असते. वृद्ध लोकांना शांत आणि सुरक्षित आयुष्य हवं असतं. चालायला चांगले रस्ते, बसायला बाक, बागा, मोफत किंवा स्वस्त औषधं, सरकारी दवाखान्यात नीट इलाज एवढंच त्यांना पुरेसं वाटतं. त्यांच्याशी आदरानं वागलं जावं, कुठल्याही कामासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागू नयेत, असं त्यांना वाटतं.
दुकानदार, छोटे व्यावसायिक, फेरीवाले यांनाही पालिकेकडून खूप अपेक्षा असतात. कर प्रणाली सोपी असावी, दंड उगाच लावू नये, लायसन्स पटकन मिळावं, बाजार स्वच्छ आणि नीटनेटका असावा, असं त्यांना वाटतं. ग्राहक येण्यासाठी रस्ता, लाईट, पार्किंग यांची सोय चांगली असावी, अशी त्यांची अपेक्षा असते.
पण एवढ्या सगळ्या अपेक्षांबरोबरच लोकांच्या मनात थोडी भीती आणि शंका असतेच. ‘निवडणुकीत जे बोलले, ते खरंच करतील का?’ ‘फक्त भाषणच राहील की काम होईल?’ ‘भ्रष्टाचार कमी होईल का?’ असे प्रश्न लोक स्वतःलाच विचारतात. आधीही अनेक वेळा मोठी वचने दिली गेली, पण सगळी पूर्ण झालीच असं नाही. म्हणून आता लोक म्हणतात – आम्हाला मोठी भाषणं नकोत, आम्हाला काम करून दाखवा.
आज लोक जास्त जागरूक झाले आहेत. सोशल मीडियावर फोटो टाकून रस्त्याचे खड्डे दाखवतात, कचऱ्याचे ढीग दाखवतात, पाण्याच्या समस्यांबद्दल लिहितात. चुकीचं वाटलं तर आवाज उठवतात. त्यामुळे सत्तेत बसलेल्यांवर आता जास्त दबाव असतो.
शेवटी मुंबईकरांना फार अवघड काही नको असतं. त्यांना फक्त इतकंच हवं असतं – आयुष्य थोडं तरी सोपं व्हावं. सकाळी कामावर जाताना अडचण नको, पाणी-वीज वेळेवर मिळावं, आजारी पडलो तर चांगला इलाज मिळावा, मुलांना नीट शिक्षण मिळावं, आणि शहरात सुरक्षितपणे, सन्मानाने जगता यावं. सत्तेत आलेल्यांनी हे करून दाखवलं, तरच लोक मनापासून म्हणतील – आमचं मत खरंच कामी आलं. मात्र हे खरं होईल का नाही ते येणारा काळच ठरवेल!