Monday, January 19, 2026

कोकणात महायुतीची मोर्चेबांधणी...!

कोकणात महायुतीची मोर्चेबांधणी...!

कोणत्याही निवडणुका लढविण्यासाठी आवश्यक असते ते कार्यकर्त्यांचे पाठबळ. महाविकास आघाडीकडे कार्यकर्तेच दिसत नाहीत आणि उरलेही नाहीत. शेवटी सत्तेच्या विरोधात किती काळ विरोधी पक्षाची भूमिका घेऊन उभं राहायचं, असा प्रश्न कार्यकर्त्यांना सातत्याने संभ्रमित करतो. याच संभ्रमावस्थेत कोकणातील महाविकास आघाडी मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुकीत दुभंगली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा देत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची वाटचाल सुरू असल्याने साहजिकच या निवडणुकीत कोकणात तरी भाजप, शिवसेना(शिंदे) गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) आरपीआय या घटक पक्षांच्या महायुतीसमोर आव्हान उभे करण्याची मानसिकता महाविकास आघाडीमध्ये नाही. त्या तुलनेत महायुतीच्या मोर्चेबांधणीने कमालीचा वेग घेतला आहे...

वार्तापत्र कोकण संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल भारतीय जनतापक्ष, शिवसेना महायुतीच्या बाजूने लागले आहेत. महानगरांच्या निकालात राज्यातील शहरी जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने लागलेला असताना आता राज्यात पहिल्या टप्प्यातील ५ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राज्यातील कोकण भागात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीतही कोकण महायुतीच्यासोबत राहिले आहे. कोकणामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका होतील असे अपेक्षित आहे.

रायगड जिल्ह्यात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) व शिवसेना (शिंदेगट) यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतील संघर्षाचीही किनार आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे अजिबात पटत नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून नेहमीच कळीचा मुद्दा उपस्थित होत असतो. खा. सुनील तटकरे आणि रायगडातील सेनेचे आमदार एकत्र येतील अशी आजच्या क्षणाला जरी शक्यता धूसर असली तरीही एकूणच राज्यातील महायुतीचा माहोल पाहता रायगड जिल्हा परिषद निवडणुकीतही युती होऊ शकते किंवा मैत्रीपूर्ण लढतही होऊ शकेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा म्हटली जाते. जरी विधानसभा निवडणूक २०२९ मध्ये म्हणजे आणखी तीन वर्षांनी होणार असल्या तरीही जिल्हा परिषद, समिती निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या भागात कार्यकर्त्यांचे संघटन करत असतो. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या पक्षीय संघटनात्मक दृष्ट्याही महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळेही या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं असते. रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदेगट यांची युती होऊ शकते. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय देखील असेलच. तसे पाहता महायुतीची मोर्चेबांधणी गेले दोन दिवस कोकणात सुरू झाली आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे गेल्यास निवडणुकीत चांगले यश मिळू शकते. त्यामुळेच कोणत्याही स्थितीत युती करण्याच्या निर्णयावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत झालं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या घटकपक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडी आजही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. नगरपालिका निवडणुकीत कोकणात महाविकास आघाडी कुठे दिसलीच नाही. शहरी भागात महाविकास आघाडीची ही अशी अवस्था झाली आहे. हे कमी म्हणून की काय राज्यातील निवडणूक निकालानेही महाविकास आघाडीत काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्याचबरोबर निवडणुकीपुरते कार्यकर्ते लोकांसमोर जातात. इतरवेळी कार्यकर्ते कुठे दिसतच नाहीत. कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कार्यकर्त्यांना पक्षीय काम करावेसे वाटेल अशी कोणतीही उत्साहवर्धक स्थिती नाही. त्यामुळेच कोकणात मागे पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी कुठे दिसलीच नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उतरण्याची मानसिकताही महाविकास आघाडीकडे नाही. कोकणात काही भागात महाविकास आघाडीतील काही मोजके कार्यकर्ते स्वत: कार्यरत असल्याने ते या निवडणुकीत निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करतील. महाविकास आघाडीकडे कार्यकर्त्यांचे आवश्यक असणारे बळ नसल्याने त्यांचा फारसा प्रयत्न असणार नाही. कोकणातील चारही जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद अगदीच क्षीण होत चालली आहे. नगरपालिका निवडणुकीत राजापूर नगरपालिकेत जे यश कॉग्रेसला मिळाले ते यश कॉग्रेस पक्षाचे नव्हे, तर ते यश हे राजापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या अॅड. हुस्नबानो खलीफे यांचेच आहे. वैयक्तिक स्तरावर नगराध्यक्ष खलिफे यांचा जो जनसंपर्क राहीला त्यामुळे एकीकडे कोकणात चित्र वेगळे असताना मात्र राजापूरला अॅड. खलीफे या निवडणुकीत यश मिळवू शकल्या.त्या-त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांपुरते पक्षाचे अस्तित्व राहीलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे कोणाचा पायपोस कुणाचा नाही, अशी स्थिती आहे.

कोणत्याही निवडणुका लढविण्यासाठी आवश्यक असते ते कार्यकर्त्यांचे पाठबळ. महाविकास आघाडीकडे कार्यकर्तेच दिसतही नाहीत आणि उरलेही नाहीत. शेवटी सत्तेच्या विरोधात कितीकाळ विरोधी पक्षाची भूमिका घेऊन उभं रहायचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना सातत्याने संभ्रमित करतो. याच संभ्रमावस्थेत कोकणातील महाविकास आघाडी मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिका निवडणुकीत दुभंगली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा देत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची वाटचाल सुरू असल्याने साहजिकच या निवडणुकीत कोकणात तरी भाजप, शिवसेना(शिंदे) गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवारगट) आरपीआय या घटक पक्षांच्या महायुतीसमोर आव्हान उभे करण्याची मानसिकता महाविकास आघाडीमध्ये नाही. यामुळेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती कोकणात निवडणुकीची जी मोर्चेबांधणी करीत आहे. ती यशस्वी होणारी आहे.

रायगड जिल्ह्यात थोडफार प्रमाणात महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष निवडणुकीत दिसू शकेल. येत्या दोन-तीन दिवसात कोकणातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.

Comments
Add Comment