मोहित सोमण: आज जागतिक भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोने ३% व चांदी ५% इंट्राडे उसळल्याने मोठी दरवाढ या कमोडिटीत झाली. मोठ्या प्रमाणात रॅली झाल्याने चांदी तर ३०५००० रूपये प्रति किलो पातळीवर या इतिहासात पहिल्यांदाच पोहोचली आहे जी रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १९१ रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७५ रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १४३ रूपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४५६९, २२ कॅरेटसाठी १३३५५, १८ कॅरेटसाठी १०९२७ रूपयांवर पोहोचले. प्रति तोळा किंमतीत बघितल्यास आकडेवारीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १९१० रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १७५० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १४३० रूपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४५६९०, २२ कॅरेटसाठी १३३५५०, १८ कॅरेटसाठी १०९२७० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४५६९, २२ कॅरेटसाठी १३३५५, १८ कॅरेटसाठी १०९२७ रूपयांवर पोहोचले. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर प्रति किलो संध्याकाळपर्यंत १.८६% उसळत १४५१६८ रूपयांवर पोहोचले. युएस स्पॉट सोने दुपारपर्यंत १.६% ने वाढून ४६६७.३३ डॉलर प्रति औंस झाले असून तर सत्राच्या सुरुवातीला ते ४६९०.७५ डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते.
जागतिक पातळीवर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.६२% वाढ संध्याकाळपर्यंत झाली. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ४६७०.४४ औंसवर गेली आहे. भूराजकीय राजकीय अस्थिरतेचा फटका सोन्याच्या साखळी पुरवठ्यात बसला. उपलब्ध साठ्यापेक्षा मोठ्या प्रमाणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी व महत्व प्राप्त झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड मिळवण्याच्या आपल्या प्रयत्नानंतर आता आठ युरोपीय राष्ट्रांवर नवीन अतिरिक्त शुल्क (Tariff) लावण्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजारातील वायदासह आशियाई व्यापारात सोन्याच्या किमती विक्रमी नव्या उच्चांकावर (All time High ) पातळीवर पोहोचल्या तसेच त्या किंमती ४७०० डॉलर प्रति औंसच्या जवळ पोहोचल्या होत्या. ट्रम्प यांनी आठवड्याच्या शेवटी सांगितले की, जे आठ युरोपीय देश अमेरिकेने ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या त्यांच्या योजनेला विरोध करत आहेत, त्यांच्यावर ते नवीन शुल्क लावतील, त्यानंतर सोन्याच्या किमतींमधील गेल्या आठवड्यातील तेजी कायम राहिली. या धमकीबाबत युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिका १ फेब्रुवारीपासून संबंधित देशांच्या वस्तूंवर १०% शुल्क आकारेल आणि जर कोणताही करार झाला नाही, तर जूनमध्ये हा दर २५% पर्यंत वाढवला जाईल. लक्ष्य केलेल्या देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम, तसेच अनेक नॉर्डिक आणि उत्तर युरोपीय देशांचा समावेश आहे.
तज्ञांच्या मते, या घोषणेमुळे युरोपीय अधिकाऱ्यांकडून तीव्र टीका झाली आणि व्यापक अटलांटिक पार व्यापार विवादाची भीती वाढली ज्यामुळे गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणुकीचा आश्रय घेतला आहे. शुल्काच्या धमकीमुळे सोन्यासाठी आधीच अनुकूल असलेल्या परिस्थितीला आणखी बळ मिळाले,ज्याला गेल्या काही आठवड्यांपासून फेडरल रिझर्व्ह या वर्षाच्या अखेरीस चलनविषयक धोरण शिथिल करण्यास सुरुवात करेल या अपेक्षांचा फायदा झाला आहे. अमेरिकेचा कमकुवत आर्थिक डेटा आणि महागाई कमी होण्याची चिन्हे यामुळे व्याजदर कपातीची शक्यता बळकट झाली होती.
चांदीत तर रेकॉर्ड ब्रेक वाढ !
चांदीच्या दरात आज रेकोर्ड ब्रेक ऐतिहासिक वाढ झाली आहे. इतिहासात प्रथमच चांदीने ३०५००० प्रति किलोची पातळी गाठली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपयाने वाढ झाली असून प्रति किलो दरात तब्बल १०००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर प्रति ग्रॅम ३०५ रूपये प्रति किलो दर ३०५००० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर संकेतस्थळावरील माहितीनुसार १०० रूपयांनी वाढत ३०५० रूपयांवर आहेत. तर प्रति किलो दर ३०५००० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या १० दिवसात चांदी जवळपास ५७००० रुपये प्रति किलोने वाढली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या दरात संध्याकाळपर्यंत ५.१७% वाढ झाल्याने दरपातळी ३०२६४२ रूपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ५.१०% वाढ झाली त्यामुळे चांदीचे दर प्रति डॉलरमागे ९३.०५ पातळीवर व्यवहार करत आहेत. एकीकडे चांदीच्या दरातही सुरक्षित गुंतवणूक म्हणून अस्थिरतेत मागणी वाढत असतानाही चांदीतही ग्रीनलँड वादाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा बाळगला. अशा स्थितीत युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातीतील साशंकता कायम असताना मोठ्या प्रमाणात चांदीच्या औद्योगिक मागणीत वाढ होत असल्याचाही फटका जगभरातील बाजारात जाणवत आहे.
आजच्या एकूणच सोने चांदीतील होत असलेल्या हालचालींवर भाष्य करताना अशिका ग्लोबल ऑफिस सर्विसेसचे सह संस्थापक अमित जैन म्हणाले आहेत की,' सोने आणि चांदी आता केवळ वस्तू राहिलेल्या नाहीत, तर त्या धातूच्या स्वरूपातील भूराजकीय ठरत आहेत. जेव्हा प्रमुख सत्ता ग्रीनलंडसारख्या संसाधनांवरून भांडतात, तेव्हा बाजारपेठा आपोआपच जोखमीचा अंदाज लावतात आणि मौल्यवान धातू हे नैसर्गिकरित्या सुरक्षित आश्रयस्थान बनतात. ही तेजी केवळ सट्टेबाजीचे नव्हे, तर जागतिक स्थिरतेवरील विश्वासाच्या गंभीर अभावाचे प्रतिबिंब आहे.'
देशांतर्गत बाजारपेठेत युएस डॉलर तुलनेत रूपया १६ पैसे वधारला असला तरी दिवसभरात डॉलरने आज आगेकूच केली. डॉलरच्या निर्देशांकात आज रुपयांच्या तुलनेत सकाळच्या सत्रापासूनच वाढ झाली होती. याच घडामोडीनंतर सोन्यावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'रुपया ९०.९० रूपयांच्या खाली कमकुवत झाल्यामुळे देशांतर्गत किमतींना आधार मिळाल्याने सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली, तर नवीन भूराजकीय चिंतांमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीत भर पडली. ट्रम्प यांनी युरोपियन युनियन देशांवर १०% शुल्क लावण्याच्या घोषणेमुळे जागतिक व्यापाराबाबतची अनिश्चितता पुन्हा वाढली आहे आणि अमेरिका-भारत व्यापार कराराच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याव्यतिरिक्त, ग्रीनलंडचा मुद्दा चर्चेत आल्यासह अमेरिकेकडून निर्माण होणाऱ्या भूराजकीय जोखमींनी जागतिक जोखीम भावना वाढवली आहे. अशा परिस्थितीत, सोने हा गुंतवणुकीसाठी पसंतीचा पर्याय राहिला आहे आणि कोणताही किरकोळ नफा वसुलीची संधी खरेदीची संधी म्हणून पाहिली जात आहे.'
आजच्या चांदीच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना तज्ञ काय म्हणाले?
हरीश व्ही, कमोडिटी रिसर्च प्रमुख, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड- जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या मिश्र प्रभावामुळे भारतातील चांदीच्या किमती प्रति किलोग्राम ३ लाख रुपयांच्या जवळ पोहोचल्या आहेत.या दरवाढीमागील एक प्रमुख कारण म्हणजे जागतिक पुरवठ्यातील सततची कमतरता...जगभरातील चांदीचे उत्पादन वाढत्या मागणीनुसार पुरेसे ठरत नाहीये, विशेषतः खाण उत्पादन मर्यादित असल्याने आणि पुनर्वापराचे प्रमाण कमी असल्याने, ज्यामुळे २०२६ पर्यंत टिकणारी संरचनात्मक कमतरता निर्माण झाली आहे. चांदीची औद्योगिक मागणी लक्षणीय वाढली आहे. चांदी हा सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रगत तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे आणि जागतिक ऊर्जा संक्रमणाचा भाग म्हणून ही क्षेत्रे वेगाने विस्तारत आहेत. स्थूल-आर्थिक परिस्थितीनेही किमतींना आधार दिला आहे. भूराजकीय अनिश्चितता, चलनातील अस्थिरता आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे गुंतवणूकदार चांदीकडे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहत आहेत, ज्यामुळे चांदीच्या ईटीएफमध्ये किरकोळ आणि संस्थात्मक दोन्ही प्रकारचा निधी आकर्षित होत आहे.
भारतातील देशांतर्गत घटक: ज्यात सण आणि लग्नसराईतील खरेदी, रुपयाचे अवमूल्यन झाल्याने आयात महाग होणे आणि स्थानिक मागणीतील वाढ यांचा समावेश आहे, यांनी चांदीच्या किमतींमधील तेजीला आणखी चालना दिली आहे. एकूणच कमी पुरवठा, मजबूत मागणी आणि तेजीची गुंतवणूकदार भावना यांच्या या दुर्मिळ संयोजनामुळे भारतीय बाजारात चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचल्या आहेत.'
जतीन त्रिवेदी, व्हीपी रिसर्च विश्लेषक- कमोडिटी आणि चलन, एलकेपी सिक्युरिटीज - चांदीच्या किमती ३ लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्यामागे संरचनात्मक आणि स्थूल घटकांचे शक्तिशाली मिश्रण कारणीभूत आहे. किंमत १००००० रुपयांच्या पुढे गेल्यापासून देशांतर्गत प्रत्यक्ष मागणीत वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर, स्वच्छ ऊर्जा,इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मजबूत औद्योगिक मागणीमुळे पुरवठा कमी होत आहे तर रशिया-युक्रेन, इराण-इस्त्रायल, अमेरिका-इराण आणि अगदी ग्रीनलँडपर्यंत पसरलेल्या वाढत्या भूराजकीय तणावामुळे जोखीम प्रीमियम वाढला आहे. डॉलर निर्देशांकातील कमजोरी आणि सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून आणि फियाट चलनांना पर्याय म्हणून मौल्यवान धातूंना वाढलेली पसंती यामुळे गुंतवणुकीची मागणी आणखी वाढली आहे, ज्यामुळे चांदीच्या तेजीला गती मिळाली आहे.
आमिर मकडा कमोडिटी आणि चलन विश्लेषक, चॉइस ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड- जानेवारी २०२६ च्या मध्यापर्यंत, चांदीने जवळपास ३०% परतावा दिला आहे, जो २०२५ च्या तेजीच्या जोरावर आधारित आहे. औद्योगिक टंचाई आणि भूराजकीय बदलांच्या "परिपूर्ण वादळामुळे" चांदी ९३ डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचली आहे, जी पातळी एकेकाळी अकल्पनीय मानली जात होती. सौर फोटोव्होल्टेइक क्षमतेचा विस्तार, पारंपरिक गाड्यांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक चांदीची आवश्यकता असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांकडून वाढती मागणी आणि चांदी-आधारित घटकांवर अवलंबून असलेल्या एआय आणि डेटा केंद्रांच्या वाढत्या गरजा या तीन प्रमुख तांत्रिक प्रवृत्तींमुळे चांदी एक महत्त्वपूर्ण औद्योगिक वस्तू बनली आहे त्याच वेळी, चीनच्या कठोर निर्यात परवाना धोरणामुळे आणि मर्यादित खाणकाम वाढीमुळे बाजारात संरचनात्मक पुरवठ्याची कमतरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत चांदीची जागतिक कमतरता सुमारे २३० दशलक्ष औंस इतकी अंदाजित आहे. याव्यतिरिक्त, अपेक्षित व्याजदर कपात आणि इराण व व्हेनेझुएलामधील भूराजकीय तणावासारख्या मॅक्रोइकॉनॉमिक घटकांनी चांदीचे सुरक्षित गुंतवणुकीचे आकर्षण वाढवले आहे, ज्यामुळे अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार स्थिरता शोधत असल्याने तिच्या मागणीत आणखी भर पडली आहे. सोने-चांदी गुणोत्तरातील लक्षणीय घट आगामी वर्षांमध्ये चांदीसाठी संभाव्य तेजीचा कल दर्शवते. सोने/चांदी गुणोत्तर त्याच्या ऐतिहासिक सरासरी पातळीवर म्हणजेच ५०:१ वर आले आहे, जे दर्शवते की चांदीच्या किमतीपेक्षा चांदीची कामगिरी सरस आहे.ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १०% शुल्क वाढवण्याची केलेली नवीनतम घोषणा जी जूनपर्यंत २५% पर्यंत वाढू शकते यामुळे चांदीला अतिरिक्त चालना मिळाली आहे.
तांत्रिक आलेखांकडे (Technical Chart) पाहता, आम्हाला चांदीमध्ये आणखी तेजीची अपेक्षा आहे आणि तात्काळ आधार २५५१०० पातळीवर असलेल्या २०-डीईएमए (Daily Moving Average DMA) पातळीवर असेल. दैनिक एसएआर २४९५०० पातळीवर आहे. वरच्या पातळीसाठी, ट्रेंड-आधारित फिबोनॅची विस्ताराची २६१% पातळी ३६२९३७ पातळीवर आहे. तथापि, अलीकडील सत्रांमध्ये, किमतीच्या वाढीसह, आम्ही दैनिक आलेखांवर आरएसआय बेरिश डायव्हर्जन्स पाहिला आहे, जो एक क्लासिक "रेड फ्लॅग" इशारा आहे. हे सूचित करते की जरी किंमत वाढत असली आणि नवीन उच्चांक गाठत असली तरी, त्या वाढीला चालना देणारी अंतर्गत गती प्रत्यक्षात कमकुवत होत आहे. यासोबतच, मार्च करारात किमती वाढल्या असताना ओपन इंटरेस्ट (OI) पातळी ९८५० लॉट्सपर्यंत खाली आल्याचे आपण पाहू शकतो, जे चांदीमध्ये लाँग पोझिशन कमी होत असल्याचे दर्शवते. ज्या व्यापाऱ्यांकडे आधीच लाँग पोझिशन आहे सध्याच्या पातळीवर नफावसुलीची शक्यता अधिक आहे.'
पुढे गुंतवणूकदारांसाठी काय?
विश्लेषकांच्या मते,सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून धोरणात्मक शिथिलतेच्या अपेक्षांमुळे, येत्या आठवड्यात सोन्याच्या किमतीतील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे, तर चांदीमध्ये मोठ्या तेजीनंतर स्थिरीकरण दिसून येऊ शकते. गुंतवणूकदारांचे लक्ष प्रमुख अर्थव्यवस्थांमधील महागाईच्या आकडेवारीसह, वैयक्तिक उपभोग खर्च (PCE) निर्देशांक, जीडीपी वाढ, पीएमआय आकडेवारी आणि बेरोजगारीच्या दाव्यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक स्थूल-आर्थिक डेटाकडे असेल जे फेडच्या धोरणात्मक दृष्टिकोनाबद्दल नवीन संकेत देतील असे विश्लेषक सांगत आहेत.
याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ईबीजी कमोडिटी अँड करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मेर म्हणाले चीनकडून येणाऱ्या आर्थिक आकडेवारीवर लक्ष केंद्रित केले जाईल जे औद्योगिक धातूंच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. इतर घडामोडींमध्ये,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जागतिक आर्थिक मंचावरील भाषण आणि व्यापारावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल'.






