महापौरांची निवड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक संपन्न होवून मतदारांनी महापालिकेत आपले प्रतिनिधी नगरसेवकांच्या रुपात निवडून दिले आहे. मात्र, नगरसेवक निवडले गेले असले तरी महापौरपदासाठी आरक्षण सोडत अद्याप न निघाल्याने महापौरांची निवड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबई महापालिकेत होणारे झेंडावंदन हे नवनिर्वाचित महापौरांच्या होणार नाही. हा मान महापौरांचा असला तरी यंदा तरी हा मान महापौरांना मिळणार नसून हे झेंडावंदन यंदाही महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या हस्तेच पार पडण्याची शक्यता दाट शक्यता आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आणि १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी महापौरांच्या हस्ते झेंडावंदन केले जाते. परंतु ७ मार्च २०२२पासून नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांच्या हाती आली आहेत. त्यामुळे मार्च २०२२पासून प्रशासक नियुक्त महापालिकेत आयुक्तांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन तथा ध्वजारोहण केले जाते. परंतु यंदाच्या निवडणूका जाहीर होवून १६ जानेवारी रोजी निकाल लागल्यामुळे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम नवनियुक्त महापौरांच्या हस्ते पार पडेल अशाप्रकारची शक्यता होती.
परंतु नगरसेवकांची निवड झाल्यानंतरही महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर न झाल्यामुळे महापौर निवडीची प्रक्रिया हाती घेता येत नाही.तसेच येत्या १९ किंवा २० जानेवारी रोजी नगरविकास खात्यामार्फत या महापौर पदाची आरक्षण सोडत काढल्यानंतरही पुढील सात ते आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित असल्याने २६ जानेवारी पूर्वी महापौरपदाची निवड अशक्यच असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी महापौरांऐवजी महापालिका आयुक्त हेच महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण तथा झेंडावंदन करतील अशी माहिती मिळत आहे.