मुंबई : अंधेरीत लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका सोसायटीच्या दिशेने अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार करणारे घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी सोसायटीमधून दोन गोळ्या जप्त केल्या आहेत. या गोळीबारामुळे सोसायटीत आलेल्या गोळ्या असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जप्त केलेल्या गोळ्या तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवल्या आहेत. सोसायटीतले तसेच परिसरातले सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार करणारे कोण होते ? त्यांनी गोळीबार का केला ? हे अद्याप समजलेले नाही.
कोणाला तरी घाबरवणे अथवा दहशत बसवून खंडणी वसूल करणे असा काही हेतू होता का ? याचा पोलीस तपास सुरू आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घराच्या दिशेने गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रकार घडला होता. आता नव्या घटनेत अंधेरीच्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका सोसायटीच्या दिशेने अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.






