मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर आहेत, तेथून ते परतल्यानंतर मुंबईच्या महापौर पदाबाबत शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक होईल, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस (स्वित्झर्लंड) येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहेत आहेत. तेथूनच त्यांनी फोनवरून एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी महापौर पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा आणि दावोस दौऱ्यानंतर मुंबईत एकत्र बसून या मुद्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. भाजप उबाठा गटासोबत जाण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत, याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नसल्याचे फडणवीसांनी शिंदेंना सांगितले. मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य कोणत्याही पक्षाकडून होणार नाही, अशी हमी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
- दरम्यान, शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम सध्या वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. मुंबई पालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या नगरसेवकांना इथे हलवण्यात आले. मुंबईत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या, तर शिवसेना २९, उबाठा ६५, काँग्रेस २४ आणि मनसेला ६ जागांवर समाधान मानावे लागले. - भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच, शिवसेने आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलात हलवले आणि भाजपसमोर अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि शिंदे यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.






