मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेचा परिपाक म्हणून शेअर बाजारात आज मोठी घसरण होत आहे. सुरूवातीच्या कलात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण सुरु झाल्याने सेन्सेक्स ४३०.६९ व निफ्टी १३०.७५ अंकांने कोसळला. प्रामुख्याने युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर कब्जा करण्याची धमकी दिल्यानंतर युरोपियन युनियन देशांवर अतिरिक्त टॅरिफ शुल्क लावण्याची मनोकामना व्यक्त केली. यासह आशियाई बाजारातील चीनच्या चौथ्या तिमाहीची वाढ ४.५% मर्यादित राहिल्यानेही भारतीय बाजारात अस्थिरतेचा फटका कायम आहे. दुसरीकडे सकाळच्या सत्रात बँक निर्देशांकातही तुलनात्मक घसरण झाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. व्यापक निर्देशांकात सकाळी निफ्टी १००, निफ्टी २००, मिडकॅप ५०, मिडकॅप १०० निर्देशांकात घसरण झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात एफएमसीजी, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, तेल व गॅस, मिडस्मॉल हेल्थकेअर निर्देशांकात घसरण झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवेब टेक्नॉलॉजी (८.०४%), सीजी पॉवर अँड इंडस्ट्रीज (५.६०%), पुनावाला फायनान्स (३.७९%), टेक महिंद्रा (३.५९%), हिंदुस्थान झिंक (२.९९%), इंटरग्लोब एव्हिऐशन (२.७८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण विप्रो (८.५४%), आरबीएल बँक (७.६१%), टाटा मोटर्स पीव्ही व्हेईकल (४.१७%), ओला इलेक्ट्रिक (३.२८%), लीला पॅलेस हॉटेल (३.२०%) समभागात झाली आहे.
आजच्या सुरूवातीच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'जागतिक स्तरावर शेअर बाजारांसाठी नजीकच्या काळात अस्थिर दिवस असणार आहेत, कारण मोठे भूराजकीय आणि भूआर्थिक बदल बाजारांवर परिणाम करत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विघटनकारी धोरणांचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक आर्थिक वाढीवर कसा परिणाम होईल, हे सध्या आम्हाला माहीत नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील नवीनतम शुल्कांवर युरोपीय राष्ट्रे कशी प्रतिक्रिया देतील, हे पाहणे बाकी आहे. जर ट्रम्प यांनी आपल्या बोलण्यानुसार १ फेब्रुवारी रोजी आठ युरोपीय देशांवर १०% शुल्क लादले आणि त्यानंतर १ जूनपासून ते शुल्क २५% पर्यंत वाढवले, तर युरोपीय गटाकडून प्रत्युत्तर मिळणे जवळजवळ निश्चित आहे. अशा परिस्थितीत, एक व्यापारी युद्ध सुरू होईल, ज्यामुळे जागतिक व्यापार आणि वाढीवर परिणाम होईल. अशा घडामोडींचा बाजारावर होणारा संभाव्य परिणाम नकारात्मक असेल. भूतकाळात घडल्याप्रमाणे ट्रम्प माघार घेतील, अशी शक्यताही आहे. गुंतवणूकदार परिस्थिती उलगडण्याची वाट पाहू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदार या अस्थिरतेचा फायदा घेऊन निवडकपणे घसरणीच्या वेळी खरेदी करू शकतात, विशेषतः उच्च दर्जाच्या लार्ज-कॅप कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून, ज्या अखेरीस या संकटातून बाहेर पडतील.'






