अभिनेता पराग त्यागीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर खळबळजनक वक्तव्य केले आहे.जून २०२५ मध्ये शेफालीचा अचानक मृत्यू झाला होता,ज्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला होता. शेफालीच्या मृत्यूमागे 'काळी जादू' केल्याचा आरोप परागने केला आहे.अधिकृत वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण 'हृदयविकाराचा झटका' सांगितले असतानाही, परागने यामागे करणी-बाधा किंवा काळी जादू असल्याचा दावा केला आहे.
"शेफालीवर कुणीतरी काळी जादू केली होती!"
'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अनेक महिन्यांनी तिचा पती पराग त्यागी याने या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये त्याने याविषयीचे त्याचे अनुभव सांगितले.
परागने सांगितले की, "अनेक लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण माझा यावर ठाम विश्वास आहे. जिथे देव आहे, तिथे सैतानही आहे. लोक स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. मला १०० टक्के माहिती आहे की कुणीतरी काहीतरी (काळी जादू) केले आहे". अशा प्रकारचा अनुभव मला एकदा नाही तर दोनदा आला होता. पहिल्या वेळी त्यातून बचाव झाला, पण दुसऱ्या वेळी मात्र गोष्टी खूप गंभीर होत्या, असं परागने सांगितलं.
पूजेदरम्यान जाणीव
"मी जेव्हा पूजेला बसायचो, तेव्हा मला काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव व्हायची. ती खूप हसमुख मुलगी होती, पण तिला स्पर्श केल्यावरच मला जाणवायचे की काहीतरी गडबड आहे. म्हणूनच मी पूजा वाढवली होती," असे परागने नमूद केले.
वैद्यकीय अहवाल काय सांगतो?
पराग त्यागीने काळ्या जादूचा दावा केला असला तरी, अधिकृत वैद्यकीय अहवालात शेफालीच्या मृत्यूचे कारण 'कार्डियाक अरेस्ट' (हृदयविकाराचा झटका) असे नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी किंवा तपास यंत्रणांनी आतापर्यंत कोणत्याही जादूटोण्याबाबत किंवा संशयास्पद बाबींचा उल्लेख केलेला नाही.