Monday, January 19, 2026

‘देवा’ भाऊंच्या मनात...

‘देवा’ भाऊंच्या मनात...

देशातील सर्वात मोठी महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागला. भाजप महायुतीचा महापौर बसेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. 'देवा'भाऊंच्या मनात असेल तोच महापौर होईल. अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकींचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. पुन्हा एकदा भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एवढंच नव्हे तर महापालिकांच्या एकूण २८६९ प्रभागांतून भाजपचे १४२५ नगरसेवक निवडून आले. भाजपच्या विजयी नगरसेवकांचा आकडा सर्वाधिक आहे. त्या खालोखाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यश मिळाले. त्यांचे ३३९ नगरसेवक निवडून आले. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून, त्यांची संख्या ३३४ आहे. राज्यात महायुतीत सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पुणे-चिंचवड महापालिकेत विरोधकांशी हातमिळवणी केली. त्यातून त्यांना १६७ नगरसेवकांना निवडून आणण्यात यश लाभले. या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना अपवादात्मक स्थितीत पाहायला मिळाले. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा राज्यात बोलबाला होता. याआधी झालेल्या नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीतही विरोधक लढताना कुठे दिसले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे जे उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यांच्यावर टीका करत, रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या ६६ उमेदवारांच्या निकालाला स्थगिती द्यावी यासाठी विरोधकांकडून उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्यात आले; परंतु त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या. सत्ताधाऱ्यांपुढे आपली डाळ शिजणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीपासून निवडणूक आयोगापुढे प्रश्नचिन्ह उभे करून त्यांच्यावर संशयाच्या नजरेतून आरोप केले; परंतु निकालाची प्रक्रिया पार पडताना, राज्यभरात कुठेही राज्य निवडणूक आयोगाला आरोपींच्या पिंजऱ्यात पकडता यावे, अशी संधी विरोधकांना मिळाली नाही.

देशातील सर्वात मोठी महापालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग लागला. भाजप महायुतीचा महापौर बसेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. २२७ सदस्य संख्या असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची जोड मिळाल्याने बहुमताचा ११४ चा जादुई आकडा महायुतीने पार केला आहे. महाराष्ट्रातील अन्य महापालिकेत सत्ता मिळो ना मिळो, पण मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवीच, यासाठी उबाठाने रणनीती आखली होती. मराठी अस्मिता, मराठी माणूस या मुद्यांवर भावनिक साद घालत २० वर्षांपासून अलिप्त राहिलेले ठाकरे बंधू एकत्र आले होते. सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून उल्लेख केला जातो, ती मुंबई महापालिका ठाकरे बंधूंच्या हातातून निसटली. २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेवर असताना, मराठी माणसाचे हित पाहिले असते, तर मराठी माणूस मुंबईबाहेर हद्दपार झाला नसता, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ ठाकरे बंधूंवर आली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार? मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याचा कट? असा विखारी प्रचार ठाकरे बंधूंकडून करण्यात आल्यानंतर त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुंबई महापालिकेत सर्वपक्षीय १४७ मराठी भाषिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात भाजपच्या ८९ पैकी ५६ नगरसेवकांचा समावेश आहे. महायुती सत्तेवर आली, तर हिंदू मराठी महापौर बसेल अशी स्पष्ट भूमिका भाजपने निवडणूक प्रचारात जाहीर केली होती. मराठी-अमराठी असा भेद न करता केवळ मुंबईच्या विकासाचे 'व्हिजन' घेऊन महायुतीने प्रचार केला होता. कोस्टल रोड, मेट्रोसारख्या प्रकल्पाचे केलेले काम जनतेपुढे ठेवल्याने मुंबईतील जेनझी (तरुण) हा महायुतीच्या पाठिशी उभा राहिला हे निकालातून स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गद्दार असा उल्लेख करत त्यांना हिणवण्याचा वारंवार प्रयत्न केला. निकालानंतर आता उबाठाची भाषा बदललेली दिसत आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक आपल्यासोबत आले तर, सत्तेचे स्वप्न पुरे होईल, अशी भाबडी आशा उबाठाला वाटत आहे. मातोश्रीवर भेटीसाठी आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधताना उबाठा सेनेच्या पक्ष प्रमुखाने 'देवाच्या मनात असेल तर महापौर आमचाच होईल' असे विधान करून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा महापौर होणार ही देवाची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तरीही 'देवा'भाऊंच्या मनात असेल तोच महापौर होईल. अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे; परंतु यानिमित्ताने सत्तेसाठी उबाठा किती लाचार आहे हे जनतेला आता कळून येत आहे. ‘सूर्याजी पिसाळ’, ‘जयचंद’, ‘गद्दार’, ‘नकली’ अशा अनेक उपमा देऊन एकनाथ शिंदे यांना हिणवण्यात आले होते. आता त्याच एकनाथ शिंदे यांच्यासाठी उबाठा पायघड्या घालत आहे, अशी भाषा उबाठाच्या नेत्यांकडून येत आहे. मुंबई महापालिकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 'किंग मेकर'च्या भूमिकेत आली आहे. त्यामुळेच की काय, आता उबाठाकडून त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे असे चित्र दिसत आहे. राज्यात दोन ब्रँडची चर्चा होती, त्या ठाकरे आणि पवार ब्रँडच्या निकालानंतर बोऱ्या वाजल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण राज्यात उबाठाचे फक्त १५५ नगरसेवक निवडून आले, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत बहुमताचा आकडा नसतानाही सत्ता मिळावी अशी दिवसाउजेडा उबाठाच्या नेत्यांना स्वप्ने पडत असतील, तर तो आनंद त्यांना घेऊ दे! यापुढे त्यांच्याकडे दुसरे काही उरलेले नाही, असेच म्हणावे लागेल.

Comments
Add Comment