शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय रक्ष आगामी काळात होणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे लढवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलो होतो. आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होतो. ज्या पद्धतीने महापालिकेला आम्ही एकत्रितपणे सामोरे गेले होतो, त्याच पद्धतीने पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी, आम्ही शरद पवार यांच्याकडे आलो होतो. असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांसोबत बोलत होते.
शिंदे म्हणाले, ‘आम्ही जेथे शक्य आहे, तेथे एकत्रितपणे जिल्हा परिषद-पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहोत. मात्र, काठी ठिकाणी स्वतंत्रपणे लढावे, असे वाटल्यास, तशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाण्याची चर्चा झाली’. महापालिका निवडणूक निकालासंदर्भात बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, ‘स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या संदर्भात जो कौल जनतेने दिलेला असतो, तो मान्य करावा लागतो. आम्ही तो कौल मान्य केला आहे.
विलीनीकरणावर नाही, तर निवडणुकीवर चर्चा : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, यासंदर्भात काही चर्चा झाली? यावर शिंदे म्हणाले, ‘आज विलीनीकरणाचा काही विषय नव्हता, एकत्रितपणे निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्याची परवानगी मागण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जेथे शक्य होईल तेथे एकत्रितपणे लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’






