मुंबई : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आता मुंबईला वेध लागलेत ते मुंबईचा महापौर कोण होणार याचे? मुंबईची महापालिका म्हणेजच देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि याच महापालिकेचं समीकरण म्हणजेच राजकारण तब्बल ३० वर्षांनी पालटलंय, वर्षानुवर्षे ठाकरेंची सत्ता असणारी मुंबईची महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून निसटली आहे.
भाजपाने ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला भलंमोठं खिंडार पाडलं आहे . आणि मुंबईकरांनी भाजपाच्या हातात थेट सत्तेच्या चाव्या सोपवल्या. सर्वाना आता प्रश्न पडलाय की मुंबईचा पहिला, नागरिक मुंबईचा महापौर कोण होणार हा?
मुंबईभर चर्चा रंगली आहे ती महापौर पदाच्या खुर्चीची, या शर्यतीसाठी भाजपच्या पाच नव्या चेहऱ्यांची नावे समोर आली आहेत.
तेजस्वी घोसाळकर : पहिल्या दावेदार आहेत त्या तेजस्वी घोसाळकर. दहिसरमध्ये १० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि घोसाळकर कुटुंबाचा वारसा असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचं नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे.
प्रकाश दरेकर : दुसरीकडे, अनुभवाचं पारडं जड आहे ते प्रकाश दरेकर यांचं. उत्तर-पश्चिम मुंबईत मराठी मतांवर पकड असलेले दरेकर प्रशासकीय कामात कुशल मानले जातात. पक्षाने जर अनुभवाला प्राधान्य दिलं, तर त्यांचं नाव निश्चित मानलं जातंय.
प्रभाकर शिंदे : महापालिकेच्या नियमावलीचा दांडगा अभ्यास असलेले प्रभाकर शिंदे हे तिसरे प्रबळ दावेदार आहेत. माजी गटनेते म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा जेरीस आणलं होतं.
मकरंद नार्वेकर : दक्षिण मुंबईचा विचार केल्यास मकरंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असलेल्या मकरंद यांच्याकडे मध्यमवर्गीयांचा तरुण चेहरा म्हणून पाहिलं जातं.
राजश्री शिरवाडकर : भाजपाने महिला महापौर या पर्यायाचा विचार केला तर राजश्री शिरवाडकर बाजी मारू शकतात. एक निष्ठावंत आणि आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.
मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहराचं नेतृत्व करण्यासाठी प्रशासकीय कसब आणि राजकीय वजन दोन्ही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'मराठी चेहरा' देण्याचं आश्वासन दिलंय, त्यामुळे या पाचही नावातून कोणाची वर्णी लागते, यावर भाजपाचं मुंबईवरचं नियंत्रण अवलंबून असेल.






