आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि समाजात संवाद साधण्यासाठी हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरले आहे. मात्र याच माध्यमातून एक नवीन आणि चिंताजनक प्रकार जन्माला आला – तो म्हणजे ‘ट्रोलिंग’.
ट्रोलिंग म्हणजे काय?
ट्रोलिंग म्हणजे मुद्दामहून दुसऱ्याला चिडवणं, अपमान करणं, त्याच्यावर टीका करणं – तीही विनाकारण, चुकीच्या पद्धतीने आणि बहुतेकदा अज्ञात ओळखीमागे लपून. अशा प्रकारचं वर्तन हे खास करून प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार, महिला, किंवा राजकीय मतप्रदर्शन करणाऱ्यांच्या बाबतीत जास्त दिसून येतं.
काही लोक म्हणतात की ट्रोलिंग हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक अंग आहे. विनोद किंवा व्यंग म्हणून त्याचा उपयोग होतो आणि त्यातूनच काही वेळा जनतेची भावना मोकळ्या स्वरूपात व्यक्त होते. पण हे समर्थन फार काळ टिकत नाही. कारण जिथे ट्रोलिंग सुरू होते, तिथे सुसंवाद संपतो.
ट्रोलिंगचे खूप अयोग्य परिणाम होत असतात जसे -
मानसिक त्रास : ट्रोलिंगमुळे अनेक व्यक्तींना मानसिक तणाव, न्यूनगंड, आत्मविश्वास कमी होणे यासारखे गंभीर परिणाम सहन करावे लागतात.
स्वतःला व्यक्त करण्याचा अधिकार हिरावणे: कोणी काही मत मांडले आणि लगेच त्यावर ट्रोलिंगचा मारा झाला, तर पुढच्या वेळी तो व्यक्ती बोलायचं धाडस करणार नाही.
हिंसा आणि द्वेषाला खतपाणी: ट्रोलिंग केवळ विनोदापुरता राहात नाही; त्यातून जाती, धर्म, लिंग यावर आधारित द्वेष पसरतो. हे समाजाला विघटित करण्याचं काम करतं.
भयानक दुष्परिणाम : ट्रोलिंगच्या भयानक उदाहरणांमध्ये काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. यावरून हे कृत्य किती गंभीर ठरू शकतं हे लक्षात येतं.
दोन ताजी उदाहरण देते -
१.पी. व्ही. सिंधूवर झालेलं ट्रोलिंग (२०२४)
२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्यावर “करिअर संपलं”, “नावालाच मोठी”, “फक्त जाहिराती करण्यात दंग” अशा टीकांचा मारा केला.
ट्रोलर्सनी तिच्या खेळावर नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर, वेशभूषेवर आणि सामाजिक कामांवरही अश्लील आणि असभ्य शब्दांत टीका केली.
परिणाम: सिंधूने या ट्रोलिंगला अत्यंत संयमाने उत्तर दिलं. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, “मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. पराभव हा खेळाचा भाग आहे. ट्रोलिंगने मी नक्कीच थांबणार नाही.” ही प्रतिक्रिया अत्यंत परिपक्व होती, पण ही परिस्थितीच दाखवते की समाजात यशस्वी, परिश्रमी व्यक्तींनाही विनाकारण ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
ट्रोलिंग कोणालाही वाचवत नाही, मग तो खेळाडू असो, कलाकार, शिक्षक की सामान्य व्यक्ती आणि अशा घटना आपल्याला सतत आठवत राहतात की “अभिव्यक्ती स्वातंत्र्य” म्हणजे दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे.
२. विराट कोहली – एक वाईट डाव आणि ट्रोलिंगचा मारा (२०२४ IPL)
२०२४ च्या IPL मध्ये एका सामन्यात विराट कोहली फारशी चांगली खेळी करू शकला नाही. एका चुकीच्या शॉटनंतर त्याच्या नावाने सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं.
ट्रोलिंगचे स्वरूप :
“रिटायर होऊन जा आता.”
“केवळ ब्रँडसाठी खेळतोय.”
त्याच्या कुटुंबीयांवरही दुर्भावनायुक्त पोस्ट.
परिणाम : कोहलीने मैदानावर पुन्हा उत्तम कामगिरी करत उत्तर दिलं, पण अशा ट्रोलिंगमुळे मानसिक तणाव वाढू शकतो आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासावर घातक परिणाम होऊ शकतो, हेही या प्रसंगातून लक्षात येतं.
हे उदाहरणं दाखवते की ट्रोलिंग केवळ मतप्रदर्शन नाही, तर ती व्यक्तीच्या मेहनती, कर्तृत्व, आणि आत्मिक शांततेवर होणारा एक अकारण हल्ला असतो. अभिव्यक्तीचा हक्क, जबाबदारीने वापरणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
जर ट्रोलिंग थांबवायचं असेल, तर संवेदनशीलता, सहानुभूती आणि संवादाचे शिष्टाचार टिकवणं अत्यावश्यक आहे.
मला तर वाटतं ट्रोलिंगच्या काही चांगल्या बाजूही असतील आणि कधी चांगले परिणाम ही जरी होत असले तरीही ट्रोलिंग काहीही योग्य नाही. विनोद, व्यंग, मतप्रदर्शन या गोष्टी सभ्य भाषेत, आदराने करता येतात; परंतु ट्रोलिंगचा हेतूच दुसऱ्याला खिजवणं, अपमान करणं आणि समाजात नकारात्मकता पसरवणं असा असल्यामुळे ते कधीही योग्य ठरू शकत नाही.
तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया हे समाजघटक एकत्र आणण्यासाठी आहेत. ते द्वेष, दहशत आणि मानसिक त्रास पसरवण्यासाठी नव्हे. त्यामुळे ट्रोलिंगसारख्या अयोग्य प्रकारांना थांबवणं, त्याबाबत जागरूकता निर्माण करणं, आणि ऑनलाइन व्यवहारात संवेदनशीलता राखणं हे आपलं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
ट्रोलिंग म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, ती एक हिंसक मानसिकता आहे – जी कोणालाही लागु शकते आणि कोणाच्याही आयुष्यावर खोल परिणाम करू शकते. म्हणूनच – ट्रोलिंग अयोग्यच आहे.