कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला
कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन सागर बंधू’अंतर्गत भारतीय सेनेने महत्त्वाचे यश मिळवले असून बी-४९२ महामार्गावर तिसरा बेली ब्रिज यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे.
भारतीय सेनेने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी जाफना आणि कँडी भागात दोन बेली ब्रिज उभारण्यात आले होते. आता तिसरा पूल १२० फूट लांबीचा असून सेंट्रल प्रोव्हिन्समधील बी-४९२ महामार्गावरील केएम-१५ जवळ तयार करण्यात आला आहे.
हा पूल कँडी आणि नुवारा एलिया जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. वादळानंतर हा मार्ग जवळपास एक महिन्याहून अधिक काळ बंद होता. त्यामुळे नागरिकांची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच आपत्कालीन सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्या होत्या. नव्या पुलामुळे आता हा परिसर पुन्हा मुख्य रस्त्यांशी जोडला गेला असून जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. ‘दित्वाह’ वादळामुळे श्रीलंकेत मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेक रस्ते, पूल आणि दळणवळण व्यवस्था उद्ध्वस्त झाली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू करून श्रीलंकेला तातडीची मदत पुरवली.
भारत-श्रीलंका मैत्रीचे प्रतीक
‘ऑपरेशन सागर बंधू’अंतर्गत भारताने केवळ मदत सामग्रीच नव्हे, तर तांत्रिक पथके, अभियांत्रिकी उपकरणे, वैद्यकीय सुविधा आणि तात्पुरते पूल उभारण्याचे साहित्यही पाठवले आहे. भारतीय सेनेचे अभियंते अवघड परिस्थितीतही दिवस-रात्र काम करून पूल उभारणीचे काम पूर्ण करत आहेत. यामुळे भारत-श्रीलंका मैत्री आणि शेजार धर्माचे नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक नागरिकांना दिलासा
हा पूल कँडी आणि नुवारा एलिया जिल्ह्यांना जोडणारा मुख्य मार्ग असल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे. वादळानंतर हा रस्ता जवळपास एक महिन्याहून अधिक काळ बंद होता. परिणामी शालेय विद्यार्थी, कामगार, रुग्णवाहिका सेवा, तसेच दूध, भाजीपाला, औषधे व इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला होता. आता पुलामुळे स्थानिक व्यापार, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासाला पुन्हा गती मिळणार आहे.






