महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन
झ्युरिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महाराष्ट्राचे राज्यगीत सुद्धा यावेळी सादर झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दावोस येथे आगमन होताच मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने ओवाळून स्वागत केले. स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्रारंभी स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मार्गात आणि इतरही नागरिकांनी त्यांची भेट घेतली तेव्हा प्रत्येक जण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत होता. एकूणच महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीची धूम तेथेही पाहायला मिळाली. बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या कार्यक्रमात 'स्वागत देवाभाऊ' असा फलक लागला होता.
'बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड'तर्फे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. राज्यात आपण महा-एनआरआय फोरम तयार केला असून, त्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. कोणत्याही प्रगतीचा मूलभूत विचार हा सांस्कृतिक वैभव जपण्याचा असतो. त्यातूनच भौतिक प्रगती साध्य होत असते. आता मुंबईच्या विकासाचे आणखी ठोस नियोजन आपण हाती घेतले असून पुढच्या 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा आपली मुंबई अधिक प्रगत असेल. कोणत्याही देशात जा, तेथे मराठी माणूस आज प्रगती करतो आहे. मेहनती आणि विश्वासार्ह हीच त्याची ओळख आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.






