Sunday, January 18, 2026

ताणविरहित शिक्षण

ताणविरहित शिक्षण

नक्षत्रांचे देणे,डॉ. विजया वाड

सगळे पालक तिच्या वर्गाचा आग्रह धरीत. ‘का? तिचाच वर्ग का?’ ‘अहो, आमच्या बाळूचाच तसा आग्रह आहे.’ ‘अहो पण का? कारण सांगाल का?’ ‘ते पण ज्योती टीचरांनाच विचार.’ मुख्याध्यापकांकडे शिक्षकांनीच तक्रार केली होती म्हणा. ‘ज्योती टीचर, वर्गाला परीक्षेआधी पेपर दाखवते.’ ‘ही कसली परीक्षा? हे तर चक्क चीटिंग.’ ‘ज्योती ही टीचर नाही. चीटर आहे.’ ‘तिने परीक्षेचा खेळखंडोबा मांडला आहे.’ ‘परीक्षा व्यवस्थेची पूर्ण बोळवण केली आहे.’ ‘परीक्षा ही परीक्षाच राहिली नाहीये.’ ‘मुले सरळ सांगतात, आम्हाला ज्योती टीचरच हवी, परीक्षा देताना सुपरवायझर म्हणून.” शेवटी मुख्याध्यापकांनी ज्योतीला बोलावून घेतले. ‘ज्योती टीचर, तुमच्याबद्‌दल सर्व शिक्षकांची सामूहिक तक्रार आहे.’ ‘काय सर? आपलं, मोठे सर?” ‘तुम्हाला परीक्षा या शब्दाचा अर्थ कळतो का ज्योतीबाई?’ ‘मला शिक्षण या शब्दाचा अर्थ चांगला कळतो, मोठे सर.’ ‘काय अर्थ कळतो? मला समजेल का? ज्योती टीचर.’ ‘जे मनास सुजाण बनवते, माणुसकी जगायला शिकविते, जगण्यात आनंद निर्माण करते, ते खरे शिक्षण.’ ‘अगदी बरोबर ज्योतीबाई. पण ‘परीक्षा’ या शब्दाचा अर्थ काय आहे तुमच्या शब्दकोशात?’ ‘परीक्षा म्हणजे आकलनाचा पाढा वाचणे.’ ‘म्हणजे तुम्हांला परीक्षा हा शब्द नि त्यांचा अर्थ चांगला ठाऊक आहे तर ज्योतीबाई.’ ‘माझे बोलणे तुम्हांला औधत्यपूर्ण वाटेल कदाचित मोठे सर. पण ताणविरहित परीक्षा हे शिक्षणाचे मूळ उ‌दिष्ट असले पाहिजे, असे मला प्रकर्षाने वाटते.’ ‘तांत्रिक दृष्टीने पाहिले तर ठीकच वाटते हे. पण ज्योतीबाई जो तो वि‌द्यार्थी म्हणतो की मला ज्योतीबाईच टीचर म्हणून हव्यात. त्याच टीचर सगळ्या शाळेला कशा हो पुरणार? म्हणजे सगळ्या विषयात आपणास गती आहे का?’ ‘नाही ना’... ‘परीक्षा या शब्दाचा अर्थ, मिळविलेले ज्ञान किती पचले, किती पोचले असा शुद्ध अर्थ.” ‘होय मोठे सर, मला मान्य आहे. पण पूर्णपणे मी माझे मत मांडू शकते का विस्ताराने?’ ‘बोला.’ ‘धन्यवाद सर.’ ‘आता मांडा तुमची भूमिका.’ ‘मी मुलांना आधी पेपर दाखविते सर.’ ‘अहो, तीच तक्रार आहे मजकडे.’ ‘पेपर बघायला मिळतो म्हणून कोण खूश असतात, माझे सारे वि‌द्यार्थी.’ ‘तेही चांगलेच ठाऊक आहे मला.’ ‘मोठे सर, मुले सारा पेपर बघतात आणि पुस्तकातून त्याची उत्तरे शोधतात.’ ‘ही कसली परीक्षा? हा तर शिक्षण व्यवस्थेचा अपमान.’ ‘मग सर, त्याचे फायदे कोणते आहेत ते सांगू?’ ‘सांगा.’ ‘माझ्या सुपरविजनच्या वेळी मी मुलांना आधी पेपर देते.’ ‘पुढे?’ ‘मग त्या त्या विषयाची पुस्तके देते.’ ‘मग?’ ‘मग मुले परीक्षेतील प्रश्नानुरूप उत्तरे शोधतात.’ ‘बापरे!’ ‘ही कसली परीक्षा?’ ‘ज्योतीबाई?’ ‘त्याने तीन फायदे होतात.’ ‘सांगा!’ ‘माझ्याकडे जो सुपरविजनला वर्ग येतो, त्यातील मुले स्वस्थचित्त असतात.” “अहो असणारच ना! प्रश्नपत्रिका हातात तर असते.” “मुले मनापासून अभ्यास करतात त्या प्रश्नोतरांचा!” “अहो करणारच ना।”

“मग मी पुस्तके काढून घेते त्यांच्याकडून.” ‘दूसरा फायदा म्हणजे मुले स्वस्थचित्त असतात आणि आत्मविश्वासाने भरलेली असतात. पुन्हा परीक्षेसाठी जवळ पुस्तक नसते ना त्यांच्या.’ सर निरुत्तर झाले. मला वाटते ओपन बुक टेस्टची ही जन्म कथा असावी.

Comments
Add Comment