दहशतवादी हल्ल्याचे सावट
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा यंत्रणांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) सूत्रांनुसार बंदी घातलेल्या खलिस्तानी संघटना आणि बांगलादेशस्थित दहशतवादी गट नवी दिल्लीसह विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. पंजाबमधील काही गुंड परदेशातून कार्यरत खलिस्तानी आणि कट्टरपंथी सूत्रधारांसाठी प्याद्याचे काम करत आहेत आणि खलिस्तानी दहशतवादी घटकांशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उत्तर जिल्हा पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी चार मॉक ड्रिल घेऊन तयारीला सुरुवात केली आहे. लाल किल्ला, चांदनी चौक, खारी बावली, आयएसबीटी काश्मिरी गेट, सदर बाजार आणि मेट्रो स्थानकांमध्ये हे सराव पार पडले. याचा उद्देश दहशतवादविरोधी उपाययोजना मजबूत करणे आणि नागरिकांना सतर्क राहण्यासाठी जागरूक करणे हा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात किमान ३० चित्ररथ कर्तव्य पथावरून मार्गक्रमण करणार आहेत. हे चित्ररथ भारताचा सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक परंपरा आणि विकासात्मक कामगिरीचे प्रदर्शन करतील. काही चित्ररथ ‘स्वातंत्र्याचा मंत्र – वंदे मातरम’ आणि ‘समृद्धीचा मंत्र – आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांखाली सादर केले जाणार आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ च्या १५० व्या वर्षाचे स्मरण करण्यात येणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली दिसल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे निर्देश दिले आहेत.






