कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या राजकारणात उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उबाठा गटाचे संतोष सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्षा पुष्पा दगडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीची विशेष सभा पार पडली. या पदासाठी परिवर्तन विकास आघाडीकडून संतोष पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
निर्धारित वेळेत दुसरा कोणताही अर्ज न आल्याने, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांना सन्मानाने त्यांच्या दालनात नेऊन बसवण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पुष्पा दगडे, माजी सभापती पुंडलिक पाटील, उबाठा गट, उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत, माजी सभापती प्रदीप ठाकरे, जिल्हा परिषद माजी सदस्य राजेश जाधव यांच्यासह किशोर कदम, अरुणा वायकर, संकेत भासे व अन्य सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करू," असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी निवडीनंतर व्यक्त केला.






