छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा मिळाला आहे. बीजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर पापा राव ठार झाला असून, ही कारवाई नक्षल चळवळीला मोठा धक्का मानली जात आहे. कुख्यात नक्षल नेता हिडमाच्या मृत्यूनंतर पापा राव हा नक्षल संघटनेतील सर्वात प्रभावशाली आणि धोकादायक नेता मानला जात होता.पण या नक्षलवाद्याला पोसीसांनी कंठस्नान घातलं आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमावर्ती जंगल भागात नक्षलवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी केलेल्या या कारवाईत पापा रावसह आणखी एक नक्षलवादी ठार झाला. घटनास्थळावरून दोन AK-47 रायफल्स, मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बीजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांनी या चकमकीला अधिकृत दुजोरा दिला असून, परिसरात अद्याप सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले आहे. पापा राव हा ‘भैरमगड वेस्ट बस्तर एरिया कमिटी’चा प्रमुख सदस्य होता. बस्तर, बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांत तो अनेक वर्षांपासून सक्रिय होता. त्याच्यावर ४० हून अधिक गंभीर गुन्हे, हत्याकांड आणि सुरक्षादलांवरील हल्ल्यांचे आरोप नोंदवले होते. नक्षल संघटनेत शस्त्रपुरवठा, नवीन तरुणांची भरती तसेच पीएलजीए (PLGA) साठी रसद व्यवस्थापन ही जबाबदारी त्याच्याकडे होती.
काही महिन्यांपूर्वी कांदुलनार जंगलात झालेल्या चकमकीत पापा रावची पत्नी उर्मिला, जी एरिया कमिटी सचिव होती, ठार झाली होती. त्या वेळी पापा राव जंगलाचा फायदा घेत फरार झाला होता. मात्र, यावेळी सुरक्षा दलांनी त्याला घेरून ठार केले. हिडमा आणि आता पापा रावसारख्या मोठ्या नेत्यांच्या मृत्यूमुळे बस्तरमधील नक्षलवादी चळवळीला मोठे खिंडार पडले आहे, असे मत सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केले आहे.






