कल्याण : कल्याण - पुणे लिंक रोडवरील खडवली नाका येथे असलेला जुना पूल पाडून नवा पूल बांधला जाणार आहे. हे काम २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठीच कल्याणमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय झाला आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेने कल्याण पूर्व भागासाठी वाहतूक नियंत्रण आणि वाहतुकीतील बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे.
कल्याण पूर्व येथील खडवली नाका परिसरातला जुना पूल पाडून नवा पूल बांधला जाणार आहे. हे काम होईपर्यंत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हे बदल 22 जानेवारीपासून लागू होतील आणि पुलाचं काम पूर्ण होईपर्यंत कायम राहतील.नागरिकांनी सहकार्य करावे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्या मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
खडवली नाका येथील पुणे लिंक रोडवरून विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन आणि श्रीराम चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना आनंद दिघे चौक आणि स्मशानभूमी चौकात प्रवेश बंदी असेल. वाहनांना आनंद दिघे उड्डाणपूल आणि सम्राट चौक मार्गे वळवलं जाईल. तसंच श्रीराम चौक आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून खडवली नाका आणि चाकण नाक्याकडे येणाऱ्या वाहनांना श्रीराम चौकात प्रवेश दिला जाणार नाही. ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर उल्हासनगर आणि सम्राट चौक मार्गे वळवली जातील.
हलक्या वाहनांसाठी, कल्याण पूर्वेतील रहिवाशांना कोळशेवाडी पोलीस स्टेशन किंवा विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे किंवा तेथून प्रवास करणाऱ्यांना अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा लागेल. या मार्गांमध्ये काटेमानवली पुलाखालील हनुमान नगर, चिंचपाडा रोड आणि शंभर फूट रोड मार्गे जाणारा रस्ता आहे. श्रीराम चौकातून कल्याण पूर्वेकडे येणारी वाहने महिला उद्योग केंद्राजवळील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवरून किंवा खडवलीकडे जाणारा रस्ता वापरू शकतात.






