मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता स्टेशनबाहेर पडताच सुरू होणारा ऑटो, टॅक्सी मिळवण्यासाठी होणारा संघर्ष बसची गर्दी आता इतिहासजमा होणार आहे. रिक्षा, कॅबच्या भाड्याचा ताण आणि बससाठीची गर्दी टाळत आता अवघ्या ९ रुपयांत वातानुकूलित बसमधून घर किंवा कार्यालयापर्यंत पोहोचता येणार आहे. मेट्रो लाईन-३ वर प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक व्यवस्था ठरणार आहे.
कुलाबा–वांद्रे–सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गावर प्रवाशांचा ओघ झपाट्याने वाढत आहे. मेट्रोला मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहता, प्रवाशांचा शेवटचा टप्पा अधिक सोपा करण्यासाठी मेट्रो प्रशासनाने सिटीफ्लोच्या सहकार्याने थेट बससेवेचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकांपासून जवळच्या निवासी आणि व्यावसायिक भागांपर्यंत ही सेवा थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे.
अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर केवळ काही महिन्यांतच मेट्रो-३ वरील प्रवासीसंख्या दुपटीने वाढली आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत दैनंदिन प्रवासीसंख्या आता दीड लाखांच्या घरात पोहोचली असून, काही दिवसांत तर विक्रमी गर्दीही पाहायला मिळाली आहे. या वाढत्या प्रवाहामुळे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ ही मेट्रोसमोरील सर्वात मोठी गरज ठरली होती.
बीकेसी, वरळी, आरे, जेव्हीएलआर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही पाच महत्त्वाची स्थानकं या नव्या बससेवेत महत्वाची असणार आहेत. कार्यालयीन वेळेत या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी एसी बस उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे.
कमी खर्च, अधिक आराम आणि वेळेची बचत, या तिन्ही गोष्टी एकाच प्रवासात मिळाल्याने मुंबईकरांच्या दैनंदिन धावपळीत मोठा बदल घडणार आहे. मेट्रोचा प्रवास जितका सोपा, तितकाच स्टेशनबाहेरचाही प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.






