माजी सैनिकावरील प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण
श्रीवर्धन : श्रीवर्धन एसटी स्टँड परिसरात सरकारी कर्मचारी आणि माजी सैनिक कमलाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात श्रीवर्धन पोलिसांनी कमालीची निष्काळजी दाखवत संशयास्पद भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.
पीडिताने ४ ते ५ जणांनी हल्ला केल्याचे सांगूनही एफआयआरमध्ये केवळ २ ते ३ जणांचीच नावे का? प्राणघातक हल्ला झालेला असतानाही अजामीनपात्र कलमे लावण्याऐवजी जामीनपात्र कलमे लावून आरोपींना तत्काळ फायदा का मिळवून देण्यात आला?
"अनोळखी आरोपी शोधण्यास वेळ लागेल" असे सांगून पीडिताचा सविस्तर जबाब नोंदवण्यास पोलिसांनी नकार का दिला? घटनेनंतर रात्री उशिरा पीडिताच्या विरोधातच गुन्हा दाखल करून दोन्ही बाजू समसमान दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला का? एका सरकारी कर्मचाऱ्यावर आणि माजी सैनिकावर हल्ला होऊनही पोलीस तक्रार गांभीर्याने घेत नसल्याने श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आंदोलनाचा इशारा
या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर तालुका तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.