मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या निवडणुकीत एआयएमआयएमला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. मात्र मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता मनसेची मते ही एआयएमआयएमच्या मतांपेक्षा अधिक आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री उशीरा पूर्ण झाली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील राजकीय बलाबलाचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (ठाकरे) पक्ष आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना (शिंदे) पक्ष असून कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर, एआयएमआयएम पाचव्या क्रमांकावर आहे. तर मनसेला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल आहे.
त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, समाजवादी, राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांचा क्रमांक आहे. मुंबई महापालिकेच्या रिंगणात तब्बल २९ विविध पक्ष उतरले होते. त्यापैकी केवळ नऊ पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत. यंदा मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या मनसेला एआयएमआयएमपेक्षा कमी जागा मिळाल्या. मात्र मतांच्या टक्केवारीचा आणि आकडेवारीचा विचार केला तर मनसेची मतांची टक्केवारी एआयएमआयएमपेक्षा जास्त आहे.






