तब्बल ११७ प्रथमच आले निवडून, केवळ १०० अनुभवी नगरसेवक
मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असून या निवडणुकीत मुंबई महापालिकेत निम्म्यापेक्षा अधिक नवीन चेहरे निवडून आले आहेत. तब्बल ११७ नवीन नगरसेवक निवडून आले आहेत. तर केवळ १०० नगरसेवक हे सन २०१७ आणि त्या आधीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येत महापालिकेचे प्रतिनिधीत्व केलेले माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे १०० माजी नगरसेवक असल्याने महापालिकेच्या कारभाराच्या अनुभवाची शिदोरीच्या जोरावर ११७ नवख्या नगरसेवकांना महापालिकेची कामकाज पध्दती शिकून घेत आपली चमक दाखवावी लागणार आहे. या जुन्या तथा माजी नगरसेवकांचा अनुभव नवख्या नगरसेवकांना किती फायदेशीर ठरतो की आपल्या अभ्यासू आणि वक्तृत्वाच्या प्रभावामुळे ते माज नगरसेवकांना मागे टाकतात याकडे सर्वांचे लक्ष असेल
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता निवडून आलेल्या नगरसेवकांना महापालिका सभागृहाची ओढ लागली आहे. त्यामुळे महापौरांच्या निवडीनंतर महापालिकेच्या सभागृहात बसण्याचे आणि जनतेचे प्रश्न सभागृहासह विविध वैधानिक समित्या आणि विशेष समित्यांमध्ये मांडून प्रभागातील समस्या तसेच आपल्या दृष्टीतील विकसनशील प्रभाग बनवण्याचे स्वप्न प्रत्येक नगरसेवकांचे आहे. मात्र, महापौरांची निवड होईपर्यंत नगरसेवकांना महापालिका सभागृहात बसण्याचे स्वप्न तुर्तास तरी लांबणीवर असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेचे कामकाज तथा कार्यपध्दती माहित असणारे केवळ १०० माजी नगरसेवक निवडून आलेले असून तब्बल ११७ उमेदवार हे नवखे आहे. त्यामुळे या नवख्या नगरसेवकांचा महापालिकेतील कार्यशैली कशाप्रकारे असेल तर ते जनतेचे प्रश्न मांडतानाच आपली छाप महापालिकेत निर्माण करतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असून त्यात तेजिंदर तिवाना, नवनाथ बन, योगिता पाटील, सिमा शिंदे, निशा परुळेकर बंगेरा, मनिषा कमलेश यादव, सायली कुलकर्णी, रुपेश सावरकर,डॉ हेतल गाला मोरवेकर, दिशा सुनील यादव, मिलिंद शिंदे, दिपिका घाग, रोहिदास लोखंडे, अजय पाटील, संतोष ढाले आणि गौरवी नार्वेकर शिवलकर आदी प्रथमच निवडून आलेल्या आणि ज्यांच्याकडून सभागृहात चांगले मुद्दे उपस्थित करणे अशाप्रकारची अपेक्षा आहे.
तर उबाठाचे ६५ नगरसेवक निवउन आले असून त्यांच्यामध्ये अंकित प्रभू, सारीका झोरे, लक्ष्मी भाटीया, सना खान, गितेश राऊत, लोना रावत, हरि शास्त्री, राजोल संजय पाटील, डॉ सरीता म्हस्के, अनिल कदम, निशिकांत शिंदे, विजय भगणे, श्रध्दा पेडणेकर, किरण तावडे आणि संपदा मयेकर आदी नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. तर शिवसेनेमध्ये युवा सेनेची वाघिण म्हणून आणि आपल्या तडाखेबंद भाषणासाठी ओळखली जाणारी दीक्षा हर्षल कारकर यांच्यासह रितेश कमलेश राय, निर्मिती कानडे, अपेक्षा खांडेकर यांचाही समावेश आहे. याशिवाय काँग्रेसमध्ये हैदर अस्लम अली, अमीर नसीम खान, डॉ समन आझमी, राजेश्री भाटणकर, रुक्साना पारकर आदींचा तसेच मनसेमध्ये यशवंत किल्लेदार यांच्यासह सई शिर्के, विद्या आर्य आदी नव्या चेहऱ्यांचा समावेश असून यासर्वांकडून सभागृहामध्ये चांगल्याप्रकारची कामगिरी अपेक्षित मानली जात आहे.