Sunday, January 18, 2026

स्मृती

स्मृती

जीवनगंध,पूनम राणे

गुरुपौर्णिमेचं निमित्त होतं. विविध रंगांच्या फुलांनी हॉल सजवण्यात आला होता. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रशस्त देखणा हॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. येणाऱ्या प्रत्येक शिक्षकांच्या माथ्यावर पुष्पवृष्टी होत होती. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथपर्यंत मजल गाठली ती कृतज्ञता कृतीतून व्यक्त करण्यासाठी ही सारी धडपड होती. नीतिमान आणि हसमुख शिक्षक हे शाळेचे वैभव होते. आणि या शिक्षकांचा सन्मान करण्याची ही सारी तयारी होती. कित्येक दिवस कार्यक्रमाची तयारी सुरू होती. आपल्या शाळेतील शिक्षकांना कोणती भेटवस्तू द्यावी याचा विचार ती करत होती. अखेर निर्णय पक्का झाला. भेटवस्तू कुठेही बंदिस्त राहणार नाही, अशी भेटवस्तू तिनं विचारपूर्वक निवडली. आज प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे होते. प्रत्येकाला तो देखणा कार्यक्रम पाहून आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. सन्मानचिन्ह आणि मुलायम चादर देऊन लीनाने सर्व शिक्षकांचा सत्कार केला.  प्रत्येक जण आपल्या मनोगतात तिचं भरभरून कौतुक करत होते. आपल्यासमोर भल्या मोठ्या पोस्टवर असणारी ही महान व्यक्ती कोणी एकेकाळी आपल्यासमोर चिमुरडी म्हणून आपल्या वर्गात बसली होती. आज तिच्याकडे पाहताना आपल्याला मान उंच करून पाहावी लागते. अनेक विद्यार्थी असे शिक्षण घेऊन वर्षानुवर्षं जात असतात; परंतु या मुलीसारखी लाखात एखादीच असते. मराठी माध्यमात तिचे शिक्षण झाले होते.तशी ती मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची होती.वर्गातील साठ विद्यार्थ्यांमध्ये तिचं व्यक्तिमत्त्व उठून दिसत होतं. प्रत्येक कार्यक्रमात हिरीहिरीने भाग घेत असायची. कोणत्याही सहशालेय उपक्रमात तिने नंबर सोडलाच नाही. अशी गुणी, नम्र, मनमिळाऊ लीना सर्वांचीच आवडती होती. तिचे लक्षवेधी शब्दवेधी, व्यक्तिमत्त्व सर्वांना हवे हवेसे वाटत होते. कुणालाही मदत करण्यास ती तत्पर असायची. लीनता, नम्रता, औदार्य हे तिचे विशेष गुण होते. आपल्या शिक्षकांचे मनोगत ऐकून तिला ४० वर्षांपूर्वीचे वर्गातील प्रसंग आठवत होते.प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस शिक्षकांच्या बोलण्यातील सकारात्मकता म्हणजे जीवन जगण्याचा एक वस्तू पाठ होता. हे तिला क्षणोक्षणी जाणवत होतं. प्रत्येक जण तिच्या गुणाचं तोंड भरून कौतुक करत होतं. भव्य विचार हा सुगंधासारखा असतो आणि यातूनच सद्गुणांची कीर्ती सर्वदूर पसरत असते. हेच सर्वांच्या विचारांचे तात्पर्य होते. अवघ्या एक वर्षांनंतर या शिक्षकरूपी माळेतील एक मणी निखळला. वार्ता मिळताच त्या ठिकाणी सर्वांनी धाव घेतली. झोपेतच त्यांच्या आवडत्या बाईंचा स्वर्गवास झाला होता. रात्री घेतलेली अंगावर चादर तशीच होती. मऊ, मुलायम, उबदार चादर. गुरूला शिष्याने दिलेली. तिचे पती सर्वांना डोळ्यांत पाणी आणून सांगत होते, ही चादर घरी आल्यापासून तिने दुसरी चादर केव्हा घेतलीच नाही. माझ्या लीनाने दिली आहे. असे सतत म्हणायची. ती चादर तिला फारच आवडायची. त्यांच्या पतीचे बोलणे ऐकून सर्वांना भरून आले. लीना मॅडमना आपली माया सतत त्यांच्यासोबत असल्याचा भास झाला. शेवटच्या क्षणापर्यंत आपण दिलेली भेटवस्तू आपल्या बाईंच्यासोबत राहिली याचा त्यांना अत्यंत आनंद झाला. जीवन ही समर भूमी आहे, येथे लहान- मोठ्या घटना घडतात; परंतु ही घटना मात्र चटका लावणारी होती; परंतु कायम स्मृतीत राहणारी होती. कधीही न विसरता येणारी आणि स्पंदनशील मनाला शाश्वत मूल्याकडे घेऊन जाणारी गुरू शिष्याच्या प्रेमाची. तात्पर्य :- घटना घडून जातात, पण जाता जाता पाठीमागे स्मृती ठेवून जातात.
Comments
Add Comment