नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने बेलारूसकडून Berkut‑BM कामिकाझे ड्रोनची खरेदी केली आहे. या खरेदीबाबत अधिकृत तपशील जाहीर झाले नसले, तरी या ड्रोनमुळे सेनेच्या सर्जिकल स्ट्राइक आणि प्रिसिजन अटॅक क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रोन सीमेवरील पाळत, शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ले तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक प्रहार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. Berkut‑BM हे बेलारूसमधील मिरोत्वोरेट्स कंपनीने विकसित केलेले कामिकाझे ड्रोन असून, यामध्ये जेट इंजिन बसवण्यात आले आहे. या ड्रोनची कमाल गती ४१० किमी प्रतितास असून, त्याची मारक क्षमता १५० किमीपर्यंत असल्याचे सांगितले जाते. उच्च वेग आणि अचूक लक्ष्यभेदन क्षमतेमुळे हे ड्रोन काही मिनिटांतच शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करू शकतात. कामिकाझे स्वरूपामुळे लक्ष्य नष्ट केल्यानंतर हे ड्रोन स्वतःही नष्ट होतात.
दरम्यान, भारतीय सेना ड्रोन युनिट्सवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. सेनेत १५ ते २० ‘शक्तिबाण’ रेजिमेंट्स उभारण्यात येत असून, या रेजिमेंट्समध्ये स्वार्म (झुंड) ड्रोन आणि लांब पल्ल्याचे ड्रोन समाविष्ट असणार आहेत. यामुळे ५ ते ५०० किमी अंतरावरील शत्रूच्या ठिकाणांवर काही मिनिटांत हल्ला करण्याची क्षमता सेनेला मिळणार आहे.






