अफगाणिस्तानमध्ये भारतीय औषधांचा दबदबा
काबुल : अफगाणिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेक वर्षे या बाजारावर वर्चस्व असलेला पाकिस्तान आता हळूहळू मागे हटताना दिसतो आहे, तर भारतासाठी ही मोठी व्यावसायिक संधी ठरत आहे. राजकीय तणाव, सीमा बंद आणि औषधांच्या गुणवत्तेवरून निर्माण झालेल्या वादांमुळे पाकिस्तानची औषध निर्यात घटत आहे.
या बदलाची सुरुवात एका साध्या घटनेतून झाली. अफगान ब्लॉगर फजल अफगान यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्थानिक मेडिकलमधून पाकिस्तानी पॅरासिटामोलऐवजी भारतीय औषध घेतल्याचा अनुभव सांगितला. पाकिस्तानी औषध ४० अफगानीला मिळत असताना, भारतीय औषध फक्त १० अफगानीला मिळत असल्याचे दुकानदाराने सांगितले. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बाजारातील बदलांवर लक्ष वेधले गेले.
देशांच्या आयात निर्यात आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये पाकिस्तानने अफगानिस्तानला १८६.६९ मिलियन डॉलर किमतीची औषधे निर्यात केली. मात्र मागील वर्षभरात निर्यात कमी झाली आहे. भारताचा अफगान फार्मा बाजारातील वाटा आता १२ ते १५ टक्के झाला आहे, तर पाकिस्तानचा वाटा आधीच्या ३५-४० टक्क्यापासून घटला आहे. हा बदल भारतासाठी दीर्घकालीन बिझनेस वाढीचा संकेत आहे.






