आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू
टीनएजमधल्या मुलांशी वागावं तरी कसं याबाबतीत मागील लेखात आपण किशोरावस्थेतील मुलांच्या शारीरिक, मानसिक बदलांबद्दल समजावून घेतलं आणि त्यांच्यातील हार्मोनल बदलामुळे येणारी आव्हाने जाणून घेतली. पालकांनो, आपल्याला या मुलांशी नेमकं वागावं तरी कसं असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आजच्या या लेखात मुलांचे मित्र न बनता बाबाच्या भूमिकेत राहूनही आपण आपलं पालकत्व किती निरोगी पद्धतीने निभावू शकतो, हे समजून घेऊयात.
आपलं मूल आपल्या खांद्याजवळ आलं, आपल्या पायातील चप्पल त्याच्या पायात येऊ लागते, त्यावेळेला मुलाचे मित्र बना असं सांगितलं जातं; परंतु आजच्या काळामध्ये मुलांना मित्र सहज मिळतात, त्यांच्याशी संवादही चांगला होतो. घरात मात्र त्यामानाने संवाद कमीच होतो. मुलं आपल्याला सांगताना बऱ्याच गोष्टी फिल्टर करून सांगतात. अशा वेळेस मैत्रीची भावना असणं किंवा मित्राचा रोल करणं यात हरकत काहीच नाही. पण एकूणच आजच्या जगातली आव्हानं पेलताना तसंच आकर्षणांचा मोह पडताना मुलांना सावरण्यासाठी आपल्याला त्यांचे बाबाच बनणं जास्त योग्य आहे.
खरं सांगू का या टीनेजर मुलांना आपल्या वडिलांच्या अप्रुव्हलनुसार मोठं व्हायला आवडतं, कारण ते आपल्या वडिलांचा आदर करतात. पालकांनो आपल्या मुलांचा हात हातात घेऊन, मुलांना प्रेरणा देण्याची ही संधी दिली, सपोर्ट दिला तर एक आदर्श वास्तव पुरुष बनण्यासाठी त्यांना मदतच होईल.
मित्र होण्यापेक्षा बाबा म्हणून तुम्ही या वयातील मुलांसाठी काही मर्यादा आखायलाच हव्यात. त्यांनी कोणते पर्याय निवडले, तर त्याचे परिणाम काय होतील, त्यांनी मर्यादा ओलांडल्या, स्वतःला बंधनं घालून घेतली तर काय होऊ शकतं याची जाणीव मुलांना द्यावीच लागेल. काही कठीण प्रसंगात वडिलांची भूमिकाच पार पाडावी लागते. मित्र न बनता बाबांच्या रोलमध्ये जाऊनही प्रेम, आदर आणि काळजी दाखवली तर तुमचं आणि मुलांचं नातं अधिक दृढ होईल. मुलं शहाणपणाने निर्णय घ्यायला शिकतील.
मुलात आणि तुमच्यात मोकळा संवाद घडू द्या. काही वेळेला असं होऊ शकतं की ज्या लोकांचे त्यांच्या पालकांशी जवळचं नातं बनलेलं नसतं, ते आपल्या मुलांचा मित्र बनण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मुलांशी आपले नाते अधिक दृढ होईल. तुमच्यापैकी काहीजण आपल्या वडिलांशी चांगला संवाद साधू शकले नाहीत म्हणून आपल्या मुलाचा चांगला मित्र बनावे असं त्यांना साहजिकच वाटतं, पण ते प्रत्येक वेळी योग्य ठरत नाही.
मुलं टीनएजमध्ये येता-येता बरीच स्वावलंबी होऊ लागतात. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत याचा शोध घेण्याचा प्रयत्न ते करतात. काही पालक तरुणांसारखा पेहराव करून कूल दिसण्याचा प्रयत्न करतात, पण अशा गोष्टी त्यांच्या मुलांना रुचत नाहीत. मुलांना वाटतं की तुम्ही त्यांची बरोबरी करताय आणि तुम्ही हास्यास्पद दिसता. पालकांनो सतत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्थिर मनाने मुलांना ऊर्जा दिली तर ते अधिक चांगलं ठरेल.
मुलांच्या आयुष्यात खूप मित्र येतात आणि जातात पण बाबा हा खूप मित्रांसारखा नसतो. तर तो एकमेव असतो. तुम्ही मुलांच्या आयुष्यात कायम असता. त्यामुळे त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्ही त्यांना कधी रागवला तरी इतर मित्रांप्रमाणे तुम्ही त्यांना सोडून जाल ही भीती नसते. तुमच्या मुलासाठी तुम्ही नेहमीच आहात याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी पालकांनो.
मुलांना पत्र लिहिणे ही एक अभिनव कल्पना होऊ शकते. खूप लांबलचक पत्र लिहायची गरज नाही पण जे हृदयाला भिडणार असेल असं पत्र जरूर लिहा जसं की -
प्रिय मुला,
तू किती भराभरा मोठा होतो आहेस. मला तुला हे सांगायचेय की तुझी प्रगती पाहून मला माझ्या टीनेजर मुलाचा अभिमान वाटतो. हे वाचून तू डोळे विस्फारले असशील. पण मला तुझ्याविषयी वाटतं ते अगदी खरं आहे.
अलीकडच्या दिवसात तुला मित्रांबरोबर वेळ घालवायला खूप आवडते हे मला कळतंय.
मित्र महत्त्वाचे असतात हे मला ठाऊक आहे. माझी अशी इच्छा आहे की तुझ्या मित्रांसारखाच मी तुझ्यासाठी इम्पॉर्टंट व्हावं.
तू माझ्याबरोबर भरपूर वेळ घालवावास. आता तू ज्या भूमिकेत आहेस त्या भूमिकेत मीही कधीतरी होतो. जेव्हा मी टीनेजमध्ये होतो, मी ती भूमिका छान पार पाडली आणि आता तुझी टर्न आहे. म्हणूनच आता मला तुझ्यासाठी पालकाची भूमिका निभवायलाच हवी.
याचा अर्थ असा नाही की मला तुझ्या आयुष्यात इन्व्हॉलव्ह व्हायचं नाही. याचा अर्थ असाही नाही की आपण दोघं एकत्र काहीच काम करू शकत नाही जे तू तुझ्या मित्रांबरोबर करतोस. आपण मुलगा आणि वडील यांच्या भूमिकेत असलो तरीही काही चांगले क्षण आपण एकत्र घालवू शकतो. काही कामं आपण नक्कीच एकत्र करू शकतो.
तुला चांगले मार्क्स मिळाले नाहीत तेव्हा मी थोडा नाराज होईन, पण तू प्रयत्न करतोय असे जेव्हा मला दिसेल तेव्हा मला वाटेल की हरकत नाही, तू अजून प्रयत्न करशीलच. तुझ्या चुकांची दुरुस्ती करण्यात माझी मदत तुला हवी असेल, तर मी नेहमी तयार आहे तुझ्यासाठी.
माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख काय आहे सांगू का तुला? तुला मोठं होताना पाहणं. हाच माझ्या जीवनातला आनंद आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो पण तुझ्या मित्रांसारखा नाही तर वडिलांसारखं आहे माझं प्रेम. तू आनंदात राहावे यासाठी मी काहीही करायला तयार आहे. नवनवीन गोष्टी शिकायला तुझ्या आयुष्यात तुला खूप वेळ आहे. मी तुझ्या प्रत्येक गोष्टींसाठी अवेलेबल आहे. कधी कधी तुला वाटत असेलही की मी तुझ्या अवतीभवती असू नये पण मी असणारच आहे कारण ते प्रत्येक पालकाचं कर्तव्यच आहे.
तुझा बाबा...
तुमच्या मुलांना तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते आवर्जून सांगा पालकांनो. त्यांनी काय असायला हवं हे कदाचित तुम्ही त्यांना कधी सांगितलं नसेल. ते तुम्ही तुमच्या मनाच्या तळाशी दडवून ठेवलं असेल पण तुम्ही ते संवादातून पत्रातून किंवा तुमच्या देहबोलीतूनही मुलांना सांगू शकता कारण आजच्या काळात मित्र होण्यापेक्षा बाप बनण्याची भूमिका ही अधिक जबाबदारीची आहे.