Sunday, January 18, 2026

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष

प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर 'गणेशोत्सवा'चा भव्य चित्ररथ

नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : राजधानी नवी दिल्ली ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यंदा हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. या भव्य संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेतून राज्याची परंपरा आणि आर्थिक शक्तीचे दर्शन अवघ्या जगाला घडवणार आहे. संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी या सोहळ्याच्या तयारीची अधिकृत माहिती दिली. यंदाच्या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन होईल. यंदाच्या संचलनात सहभागी होणाऱ्या एकूण ३० चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून जी सामाजिक क्रांतीची बीजे पेरली, तीच चळवळ आज आधुनिक भारताला कशी 'आत्मनिर्भर' बनवत आहे, याचे प्रभावी चित्रण यात पाहायला मिळेल. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथातून मांडली जाणार आहे. तसेच, महाराष्ट्राची अस्मिता असलेली ढोल-ताशा पथके आणि सामाजिक एकात्मता यातून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा संदेश दिला जाईल. लष्करी ताकदीच्या प्रदर्शनात यंदा प्रथमच 'बॅटल ॲरे' युद्ध रचना प्रदर्शित केली जाणार आहे. यामध्ये अर्जुन टँक, टी-९० भीष्म, राफेल विमाने आणि स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे चित्तथरारक दर्शन घडवले जाईल. संचलनात १८ लष्करी तुकड्या आणि १३ बँड्ससह एकूण ३० चित्ररथ सहभागी होतील. २,५०० कलाकारांच्या सांस्कृतिक सादरीकरणाला ऑस्कर विजेते संगीतकार एम.एम. कीरावानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा भारदस्त आवाज लाभणार आहे. यंदाचा सोहळा 'जनभागीदारी'वर आधारित असून, १०,००० विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यात इस्रोचे शास्त्रज्ञ, लखपती दीदी आणि प्रगत शेतकऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी 'राष्ट्रपर्व' हे विशेष पोर्टल आणि ॲप विकसित करण्यात आले असून, तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. संचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर 'भारत पर्व'चे आयोजन करण्यात आले असून, तिथेही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी देशवासियांना मिळणार आहे.
Comments
Add Comment