Sunday, January 18, 2026

भाजपचा मुंबईतील विजय ही अभिमानास्पद बाब

भाजपचा मुंबईतील विजय ही अभिमानास्पद बाब

मालदामध्ये ‘स्लिपर वंदे भारत’ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदींचे प्रतिपादन

नवी दिल्ली : ‘भाजपने देशात सुशासन आणि विकासाचे एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. आज संपूर्ण भारतातील जनता याचा मनापासून स्वीकार करत आहे. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आणि भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. महाराष्ट्राची राजधानी आणि जगातील सर्वात मोठ्या महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबईत भाजपने पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत विजय मिळवला,’ असे सांगताना ही एक मोठी अभिमानास्पद बाब आहे. ज्या भागांमध्ये वर्षानुवर्षे भाजपबद्दल खोट्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या गेल्या, तिथेही आता मतदार आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुमचा आजचा उत्साह पाहून मला खात्री आहे की, यावेळी बंगालची जनताही भाजपला दणदणीत विजय मिळवून देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा शुभारंभ केला. यामुळे भारतातील लांब पल्ल्याच्या प्रवासात क्रांती घडेल, असे ते म्हणाले. भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सभेला संबोधित करताना मोदी यांनी राज्यातील विकासाच्या गतीवर प्रकाश टाकला. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा व आसाममधील गुवाहाटी या शहरांना जोडणार असून, यामुळे ईशान्य व पूर्व भारतामधील कनेक्टिव्हिटी, पर्यटन व व्यापाराला चालना मिळणार असल्याचे सांगितले.

रेल्वेच्या नियमांत बदल

वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी रेल्वे बोर्डाने काही कडक नियम लागू केले आहेत: १. फक्त कन्फर्म तिकिटे : या ट्रेनमध्ये आरएसी किंवा प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसेल. फक्त पूर्णपणे पुष्टी झालेली तिकिटेच जारी केली जातील. २. आरक्षण कोटा: या ट्रेनमध्ये इतर कोणताही सामान्य कोटा लागू नसेल. केवळ महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि ड्युटी पास धारकांसाठीच आरक्षणाची तरतूद असेल.

रेल्वेबाबत माहिती

४०० किमीपर्यंतचे किमान भाडे

एसी १: १ हजार ५२० रुपये

एसी २: १ हजार २४० रुपये

एसी ३: ९६० रुपये

Comments
Add Comment